निसर्गातील अनोखा आर्किटेक्ट – पेंड्युलिन टिट

पक्ष्यातील अनोखा आर्किटेक्ट – पेंड्युलिन टिट
बहुतांश निसर्गप्रेमींनी सुगरणीचे सुंदर खोपे अर्थात घरटे बघितले आहे. आज तुम्हाला अश्या पक्ष्याच्या घरट्या बद्दल माहिती देणार आहे ज्याचे प्रवेशद्वार बघून प्रत्येकजण बुचकळ्यात पडेल. कारण हा पक्षी त्याच्या घरट्याला दोन प्रवेश मार्ग ठेवतो. एखादा बडा नेता किंवा अधिकाऱ्याच्या केबिनला जसे चेंबर व एन्टीचेंबर असे दोन भाग असतात अगदी त्याप्रमाने या घरट्याला दोन भाग असतात. जेंव्हा या घरट्यात एखादा आगंतुक येतो तेंव्हा तो मोठ्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून फसव्या जागेत फसतो. हे आगळेवेगळे घरटे बांधणाऱ्या पक्ष्याचे नाव आहे पेंड्युलिन टिट.
मान्सूनच्या काळात अनेक पक्षी घरटे करून अंडी घालतात. सध्या भारतात पक्ष्यांचा घरट्यात पाळणा हलत आहे. पेंड्युलिन टिट हा युरोप व आशिया खंडाच्या सीमावर्ती भागात आढळणारा छोटा पक्षी आहे. हा पक्षी मेंढ्याचे केस, कोळ्याचे जाळे व ईतर वस्तूंच्या सहाय्याने आपले नरम व मुलायम पांढऱ्या रंगाचे घरटे केवळ 20 ते 22 दिवसात जोडीदाराच्या सहाय्याने विणतो. ईतर वन्य जीवांपासून अंड्याचे संरक्षण व्हावे म्हणून हा पक्षी आपले घरटे झाडाच्या अगदी टोकावर विणलेले असते. ते पेंडूलम सारखे हलणारे असते. हे घरटे वजनाला पाच रुपयाच्या जुन्या नाण्यापेक्षा हलके असते. घरटे साधारण 6 ते 8 सेमी रुंद व 13 ते 16 सेमी उंच असते. काटेरी झुडूप,लहान झाड,किंवा तारांच्या कुंपणावर हे घरटे उभारले जाते.
फसवे प्रवेशद्वार :-
शिकारी पक्षी, साप किंवा अंडी खाणारे ईतर वन्यजीव जेंव्हा या घरट्यात मुख्य प्रवेशद्वारात जेव्हा प्रवेश करतात तेंव्हा त्यांची निराशा होते. पेंड्युलिन टिट हा वरच्या वास्तविक प्रवेशद्वारतून एन्टीचेंबर मध्ये प्रवेश करतो. जाताना व येताना दोन्ही वेळेस हे प्रवेश मार्ग बंद करतो. वादळ किंवा शिकारीद्वारे घरटे नष्ट झाल्यासपुन्हा नव्या जोमाने केवळ 16 ते 18 दिवसात घरटे निर्माण करतात. पेंड्युलिन टिट्स एका वेळी 4 ते 7 अंडी घालतात पण यातील सर्व अंडी जगतील याची शाश्वती नसते. साधारण 16-22 दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. या पक्ष्याची कुटुंब पद्धती पुन्हा एखाद्या अंकात जाणून घेऊया.