१५९४ ला विदर्भातून निघाली पहिली पालखी
रुख्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

१५९४ ला विदर्भातून निघाली पहिली पालखी
रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश
अमरावती /
पंढरपूरला पहिली पायदळ पालखी काढण्याचा मान हा विदर्भाला जातो. श्री विठ्ठलाच्या जीवनसंगिनी असलेल्या माता रुख्मिणी यांचे माहेर असलेले कौडंण्यपुर (जि.अमरावती) येथून १५९४ मध्ये पहिली पायदळ पालखी काढण्यात आली. ४३१ वर्षापूर्वी सदाराम महाराज यांनी हि परंपरा सुरु केली. विशेष म्हणजे पहिल्या १० दिंडीच्या इतिहासात सातवी जुनी दिंडी अमरावती जिल्ह्यातील मांजरखेड कसबा येथील श्री चंदाजी महाराज संस्थानची आहे. आज साधारण चार हजारचेवर पायदळ पालखी-दिंडी पंढरपूर येथे वारी करत असून यातील १९३८ दिंडीचा ईतिहास लेखनबद्ध केल्याचे संशोधनकर्ते सदाशिव पवळे (नांदेड) यांनी सांगितले.
जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सन १६८५ साली काढण्यात आली. त्या पालखीच्या ९१ वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यातून कौडण्यपूर ते पंढरपूर असे ६३० किमीचे अंतर सदाराम महाराजांच्या मार्गदर्शनात मार्गक्रमण करण्यात आले. आषाढी महोत्सवच्या निमित्याने महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातून २५, मध्यप्रदेश राज्यातून ३, तेलंगणामधून -३ व गुजरात राज्यातून १ दिंडी पायदळ वारी करून पंढरपूरच्या विठूमाऊली चे दर्शन घेते. अमरावती जिल्हातील साधारण २६ दिंडी-पालखी पंढरपूर पायदळ वारी करतात. यात विठ्ठल-रुक्मिणी संस्थान कौडंण्यपुर, संत चंदाजी महाराज संस्थान मांजरखेड, बेंडोजी बाबा संस्थान घुईखेड, संत गुलाबबाबा महाराज संस्थान चांदुर बाजार, संत रामनांथस्वामी संस्थान वाढोणा (रामनांथ), शंकर महाराज संस्थान ऋणमोचन, संत गाडगे बाबा महाराज अमरावती, धर्मराज नारायण महाराज पालखी अमरावती, शिवगिरी बाबा संस्थांन सायत, संपत महाराज संस्थान सोनारखेड, रुपलाल महाराज संस्थान अंजनगाव, लखमाजी महाराज संस्थान बनोजा, सोटागिरी महाराज संस्थान तिवसा , मानसिंग बाबा संस्थान भिलोरी, संत परमहंस महंमदखान महाराज संस्थान गणोरी, महर्षी वाल्मिक महाराज संस्थान खालखोली आदींचा दिंडी- पालखीचा समावेश आहे.
पहिल्या दहा पालखी – दिंडी व त्यांचे वर्ष
- १)श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौडंण्यपुर जि.अमरावती. सन१५९४
- २)समर्थ रामदास स्वामी सज्जनगड जि सातारा, सन १६५९
- ३) जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू जि पुणे. सन १६८५
- ४) जयराम स्वामी महाराज संस्थान वडगाव जि सातारा सन १६८५
- ५) रामचंद्र प्रभु देवस्थान रामगड जि बीड सन १७०४
- ६)संत गुंडा महाराज देगलुरकर जि नांदेड सन १७७४
- ७) संत चंदाजी महाराज संस्थान मांजरखेड जि अमरावती सन १७८०
- ८) संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, जि पुणे सन १८३२
- ९) जनार्दन महाराज संस्थान दौलताबाद जि. छ.संभाजीनगर १८३२
- १०) संत झेंडुजी महाराज संस्थान भुसावळ जि जळगाव, सन १८३३
मानाच्या दहा पालखी व समाविष्ट दिंड्या संख्या
मानाच्या दहा पालख्या असून त्या सोबत छोट्या मोठ्या संस्थानच्या अनेक दिंडी संलग्नित असतात.
- १ विठ्ठल रुख्मिणी संस्थान कौडिण्यपूर(अमरावती) – २
- २ संत तुकाराम महाराज संस्थान देहू (पुणे) ४०७
- ३ संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी (पुणे) ६७३
- ४ संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रंबकेश्वर (नाशिक) ५२
- ५ संत एकनाथ महाराज संस्थान पैठण(छत्रपती संभाजीनगर) ४०
- ६ संत चांगाटेश्वर संस्थान सासवड (पुणे) ३६
- ७ संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर (जळगाव) १२०
- ८ संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड(पुणे) ९९
- ९ संत निळोबाराय महाराज संस्थान पिंपळनेर (अहिल्यानगर) ६१
- १० संत नामदेव महाराज पंढरपूर (सोलापूर) ४३
शंभरावर दिंडीचे जिल्हे :
- पुणे – ५१८,
- अहिल्यानगर २१७,
- सातारा १११,
- सोलापूर १०१
विदर्भातील जिल्हानिहाय दिंड्या
- बुलढाणा ४०,
- वाशीम ३१,
- अमरावती – २६,
- अकोला १९,
- यवतमाळ २०,
- नागपूर ८,
- वर्धा ७