मी येतोय पण थोडा लवकर…

मी येतोय पण थोडा लवकर…
दरवर्षी तुम्ही माझी वाट बघता, मी दरवर्षी वेळेवर प्रवासाला निघतो पण मध्येच वादळ वारे आपले तोरा दाखवून निरनिराळ्या अडचणी निर्माण करतात. त्यामुळे मला यायला उशिरा येतो आणि याचमुळे माझी नाहक बदनामी होतेय. यावर्षी असं काही होऊ नये म्हणून मी थोडा अगोदर तयार तयारी करतोय. मी सध्या अंदमान निकोबार येथील बेटावर पर्यटन करून पुढच्या प्रवासाला निघतोय. दरवर्षी महाराष्टात साधारण 7 जून हि माझी येण्याची तारीख आहे, पण यावर्षी मी एक दिवस अगोदर म्हणजे 6 जून ला येण्याचा बेत करतोय. आता तुम्ही म्हणाल यावर्षी लवकर का ? तर मला माहिती आहे यावर्षी तुमच्या देशात लोकसभा निवडणुका सुरु आहे. त्यामुळे वातावरण जरा चांगलेच तापले आहे. शिवाय तुम्ही झाडे लावत नाही तर सूर्यदेव सुद्धा तुमच्यावर आणखीच नाराज आहे. महाराष्ट्राचे प्रसिध्द कार्टुनिष्ट गजानन घोंगडे(अकोला) तर या वाढलेल्या तापमानाचा त्याईच्या वऱ्हाडी शैलीत भलकसा पाहुणचार घेतात.
मला विदर्भासह अख्ख्या महाराष्ट्राची काळजी असल्याने तुमच्या भोवतालच्या ‘हॉट’ झालेल्या तापमानाला ‘कूल’ करण्यासाठी एक दिवस अगोदर येतोय. तसं मी हवामान खात्यांना सुद्धा येत असल्याचं ट्वीट केलं. ते तुम्हाला विविध माध्यमाद्वारा कळवतीलच . त्यांच्याकडून निरोप भेटला नाही तर मी येथे कधी व कोठे पोहोचणार हे सांगतोय. बघा सध्या 20 च्या दरम्यान अंदमान व निकोबार ला राहील. तेथील नैसर्गिक सौन्दर्य न्याहाळल्यावर पुढे 31 मे ला केरळ मध्ये दाखल होईल. केरळ म्हणजे ‘देवांची भूमी’ त्यामुळे मला सुद्धा केरळचे आकर्षण आहे. केरळ मधील मुन्नार, पेरियार, चेराई, सायलेंट व्हॅली, कोझीकोडा, अलपुझ्झा, ठेकडी आदी विविध निसर्गरम्य ठिकाणाची सैरसपाटा करणार आहे. ह्या प्रवासा दरम्यान 4 जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकल्यावर 5 जून ला गोव्यात विसावा घेणार. विसावा कसला ह्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असल्याने विविध चर्च, समुद्र किनारा व शहरी भागात पर्यावरण दिन साजरा करून नंतर दुसऱ्या दिवशी 6 जून ला आपल्या तळकोकणात दाखल होणार. पुढे पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भ व खानदेश चा दौरा करणारच. मला ईतर महाराष्ट्रात फिरतांना पंढरीला जाणारे वारकरी मिळतील, तत्पूर्वी मी आपल्या राज्यात दाखल होण्यापूर्वी आपण सुद्धा आपली राहलेली शेतीची, व्यापाराची, घराची चिल्लर कामे आटपून घ्या. आणि हो जर का माझ्या येण्यादरम्यान कोणी आणखी कोणी खोडी केली तर माझे काही नातलग मान्सून पूर्व आपला समाचार घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सावध रहा. मी येतोय तुम्ही माझ्या स्वागताची तयारी कराल हि मला खात्री आहे.
विदर्भात 25 नंतर चक्रीवादळाची शक्यता :-
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 40 ते 45 किलोमिटरच्या गतीने तुफान चक्रीवादळाची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओरिसा मार्गे हे तुफान सुरुवातीला पूर्व विदर्भात व नंतर पश्चिम विदर्भात प्रवेश करणार आहे. 25 मे नंतर पूर्व विदर्भातून नंतर 26 ते 29 दरम्यान मुसळदार पावसाची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका नागपूर व परिसरात होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.