दिन विशेष,पक्षी जगतवनस्पती जगत

अमरावतीच्या बगीच्यात 141 पक्षी प्रजातींचा अधिवास

संशोधनातील निष्कर्ष : जैवविविधतेसाठी बगीचे ठरताहेत महत्वाचे ' हॉटस्पॉट '

जागतिक जैव विविधता दिन विशेष

अमरावतीच्या बगीच्यात 141 पक्षी प्रजातींचा अधिवास

संशोधनातील निष्कर्ष : जैवविविधतेसाठी बगीचे ठरताहेत महत्वाचे ‘ हॉटस्पॉट ‘

विदर्भातील अमरावती हे दुसरे महत्वाचे शहर आहे. हे शहर मानवाच्या प्रगती सोबत पक्ष्यांच्या अधिवासासाठी सुध्दा पोषक असल्याचे संशोधनातून सिध्द झाले आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन वाघ यांनी नुकतेच अमरावती शहरातील विविध बगीचे, शासकीय, निमशासकीय संस्था परिसर व मोकळ्या जागेवर आढळणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला. यात जवळपास १४१ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली. यामध्ये २६ स्थलांतरित पक्षी प्रजाती आढळल्या असून पांढऱ्या मानेचा करकोचा, रावण पोपट, युरोपियन रोलर हे आ.यु.सी.एन.च्या धोकादायक यादीतील पक्ष्यांचा अधिवास अमरावतीत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे.

राखी धनेश पक्षी

डॉ. गजानन वाघ व त्यांच्या चमूने शहरातील जवळपास १६ विविध ठिकाणांवर पक्षी निरीक्षण करून पक्षांच्या नोंदी घेतलेल्या आहे. यात पक्षांच्या विणीचा, अन्नाचा, रातथारा आणि तेथील वनस्पतींचा व पर्यावरण बाबींचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान १४१ पक्षी प्रजातींपैकी ३८ पक्षी प्रजातींचे घरटी आढळून आलेली आहे. घरट्यांकरिता, पक्ष्यांच्या अन्नाकरता, बसण्याकरीता व रातथारा म्हणून वापर करण्याकरिता जवळपास ५२ वृक्ष प्रजातींची नोंदी घेतल्या. पक्षांनी घरट्यांकरीता वड, पिंपळ, उंबर, पाखड, कडूलिंब, काटेसावर, बकान, आकाश कंदील, महारुख, आंबा, अशोक, साग, चिंच, बदाम, सिरस, चंदन, जांभूळ, पुत्रंजिवी, शिंदोली सारख्या देशी वृक्षांची निवड केली. विशेष म्हणजे यात इंडियन ग्रे हॉर्नबिल (राखी धनेश पक्षी) याचे पक्षाचे सुद्धा घरटे आढळून आले. शहरातील बगीचे व तिथे असणाऱ्या उंच वृक्षांचा वापर विशेषता वड, पिंपळ, चिंच काटेसावर, कडुलिंब इत्यादीवर कावळा, बगळे, पोपट या प्रजातींचे पक्षी हजारोंच्या संख्येने ‘रातथारा’ म्हणून वापर करीत आहे.

संशोधनातील महत्वाच्या नोंदी :-

  • – शहरामध्ये प्रथमच रातथारांचा अभ्यास
  • – कबुतरांचा वाढती संख्या चिंतेची बाब
  • – रस्ते अपघात, उंच इमारतीचे काच, विजस्पर्श, पतंगीचा मांजा पक्ष्यांसाठी ठरताहेत जीवघेणे
  • – वाढते तापमान, प्रदूषण, प्लास्टिक कचरा यापासून धोका.

संशोधनात समाविष्ट संशोधक :

शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांचे मार्गदर्शनात प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गजानन वाघ यांनी संशोधन प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य केले. पर्यावरण विभागाचे डॉ. किर्तीध्वज गवई, वनस्पतीशास्त्र विभागचे डॉ. प्रशांत देशमुख यांचा समावेश ह्या संशोधनात होता.

देशी वृक्ष लागवड व संवर्धन :

जैवविविधता समृध्द करण्यात देशी वृक्षाचे महत्वाचे योगदान आहे. शहरातील बगीचे, शासकीय व खाजगी परिसरात प्रामुख्याने देशी वृक्षांची लागवड केल्या जावी तसेच तो परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन संशोधक प्रा.डॉ.गजानन वाघ यांनी केले.

संशोधक प्रा.डॉ.गजानन वाघ

 

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close