गौरी पूजन – कृतज्ञतेचा सोहळा
सप्तशती ग्रंथात आदिशक्तीची त्रिगुणात्मक रूपे वर्णिली आहेत. त्यानुसार महाकाली हे तमोगुणाचं, लक्ष्मी हे रजोगुणाचं तर सरस्वती हे सत्वगुणाचं रूप आहे. आदिशक्तीचे हे रजोगुणात्मक स्वरूपण महालक्ष्मी रूपात पूजिले जाते. लक्ष्मी म्हणजे उत्तम लक्षणांनी युक्त. तर रजोगुणाचा अर्थ नावीन्य, कृतिशीलता आणि सृजनशीलता सांगितला जातो. पृथ्वी ही या तिन्ही लक्षणांचं प्रतीक आहे. या सर्व तत्त्वांना आपण माता म्हणतो. अशीच एक माता आहे पृथ्वी. पृथ्वीमधे नावीन्य आहे. कृतिशीलता आहे. सृजनशीलता आहे. ही सृजनशील पृथ्वी अन्नापासून सर्वकाही भरभरून देते.
ही समृद्धी देणाऱ्या तिच्याप्रती हा कृतज्ञतेचा सोहळा. पृथ्वीचं प्रतीक म्हणजे गौरी किंवा महालक्ष्मीचं आवाहन मंगळवारला होत आहे. बुधवारला पूजन आणि गुरुवारला विसर्जन होत आहे. विदर्भात सर्वत्र यांना महालक्ष्मीच म्हणतात. विदर्भाबाहेर गौरी म्हणण्याची प्रथा आहे. ‘गौरी-गणपती’ असा तो जोडशब्द येतो. विविध नक्षत्रांवर गौरीचं आवाहन, पूजन आणि विसर्जन होतं. त्यात गौरीची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते. त्यामुळं तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. पृथ्वी, तुळशीचं झाड, जाईची वेल, वरूण देवतेची पत्नी असे अनेक अर्थ गौरी या शब्दाचे सांगितले जातात.काही ग्रंथांत द्वादश गौरींचा उल्लेख येतो. गौरी पूजनाच्या विविध पद्धती आहेत. काही ठिकाणी धातुंचे मुखवटे वापरतात. काही ठिकाणी खडे ठेवतात. काही ठिकाणी धान्यांच्या राशीवर किंवा पाच मडक्यांच्या थरांवर गौरीची स्थापना होते.
आभार मातीचे :-
शेतीसंस्कृतीतून अनेक सण आलेत. त्यातीलच एक म्हणजे गौरी पूजन. माती आपल्याला सर्व काही देते. आपल्याला जगवते. या मातीचे आभार मानण्यासाठी, तिची पूजा करण्यासाठी वेगळे विधी होतात.या पृथ्वीतून आपल्याला सर्व काही मिळतं. या पृथ्वीला आपण काहीतरी तिचं तिलाच अर्पण केलं पाहिजे. यासाठी कृषिसंस्कृतीमधून अनेक सण आलेत. सेवानिवृत्त एन.सी.सी. अधिकारी माधुरी देशपांडे यांनी गौरी पूजनाचे असे पैलू असू शकतात असं सांगितलं.
16 भाज्यांचं लॉजिक :-
महालक्ष्मींना 16 भाज्यांचा, 16 चटण्यांचा वगैरे नैवेद्य दाखवतात. आवाहनापासून विसर्जनापर्यंत महालक्ष्मीची षोडषोपचार पूजा होते. तसेच लक्ष्मीच्या चरण, नाभी, कटी म्हणजे कंबर, हृदय, नासिका म्हणजे नाक, नेत्र, ललाट, शिर अशा 16 अंगांची मंत्रासह पूजा होते. त्यामुळे 16 या संख्येला महत्त्व आलं असावं, असं पुरोहित शिवम बेडेकर म्हणाले. दरम्यान केल्या जाणाऱ्या या व्रताला ‘षोडषा उमा व्रत’ असं म्हटल्याचा उल्लेख काही ठिकाणी आहे.
हा उत्सव पावसाळ्यात येतो. भाज्यांची मुबलकता सहज असते. त्यामुळे विविध व्हेरायटीजच्या भाज्यादेखील उपलब्ध असतात. आपापल्या भूगोलाप्रमाणे विविध भाज्यांना महत्वदेखील येतं. या मातीतून निघणाऱ्या कापसाचे हार पूजनात वापरतात. या सिझनमधे येणाऱ्या विविध भाज्या ‘तेरा तुझको अर्पण’ या भावनेतून वाहिल्या जातात. त्यामुळे ज्वारी किंवा अन्य धान्यांची आंबील हे या उत्सवात विशेष महत्त्व राखते.
संपन्नतेचा सोहळा :-
पूर्वीची शेतीसंस्कृती ही संपन्न होती. त्याच संपन्नतेचा हा सोहळा आहे. धान्यांच्या राशींचीदेखील महालक्ष्मीम्हणून पूजा केली जाते. महालक्ष्मींना दागदागिने, उंची वस्त्रं अर्पण करतात. माहेरी आलेल्या लेकीचं आपण कोडकौतुक करतो. अगदी तसंच जगदंबेचंही करावं ही त्या पाठीमागची भावना. त्यामुळे तिला आहे तितका काळ संपन्नतेत ठेवण्याचा, वैभवात ठेवण्याचा हा प्रयत्न असतो. त्याचं जोरदार सेलिब्रेशनही होतं. रात्री झिम्मा आणि फुगड्या खेळल्या जातात.
गणेशोत्सवातच येणारा हा सण म्हणजे ‘सोने पे सुहागा’. आपल्या घरी येणाऱ्या या आदिशक्तीला माहेरासारखं वैभवात ठेवण्याची सर्वांची धडपड. सोन्याच्या दिव्यातली असो की स्टिलच्या दिव्यातली असो, ती ज्योत असते अंतरीच्या तेजाची. हेच तेज या उत्सवाच्या निमित्तानं सलग दरवळत राहणार आहे.
सुनील इंदुवामन ठाकरे
वणी, जि. यवतमाळ
मो. 8623053787