आता दुर्गंधीही होणार हद्दपार

आता दुर्गंधीही होणार हद्दपार
रस्त्याने साचलेले गटार, सार्वजनिक शौचालये, मलयुक्त मुताऱ्या याच्या जवळून जरी गेले तरी अनेकांना मळमळ होते. शहरी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे हि दुर्गंधी जीवघेणी ठरते. या दुर्गंधीचा नायनाट करण्यासाठी कोकणातील वेंगुर्ले येथील एका पर्यावरण प्रेमी आर्किटेक्ट युवकाने रामबाण उपाय शोधला आहे. अजित परब या युवकाने पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या जीवामृतचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. जीवामृत हे जैवीक द्रव्य सावंतवाडीतील कचरा डेपो, वेंगुर्ले येथील काही शौचालये, मुताऱ्या, शहरातील, बाजारातील सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या, मच्छीमार्केट तसेच खासगी वसाहत्यांमध्ये शिंपडले. जीवामृतच्या अफलातून प्रयोगामुळे साचलेले गटार, सार्वजनिक शौचालये, दुर्गंधीयुक्त मुताऱ्या हे ठिकाणे दुर्गंधीमुक्त झाल्याचे परब यांचे म्हणणे आहे.
जीवामृत म्हणजे नेमके काय ?
जीवांमृत म्हणजे गोमुत्र, शेण, गुळ आणि बेसन यांचे एक द्रवरुप मिश्रण आहे. कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी जीवामृतची निर्मिती करून शेतीसाठी याचा सर्वत्र प्रचार व प्रसार केला आहे. जीवामृत मधून विशिष्ठ प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. जे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या प्रक्रियेतील बॅक्टेरियांचा नाश करतात. तसेच प्रदूषण पसरवणारी सडण्याची प्रक्रिया बंद करून ते कुजण्याच्या प्रक्रियेला सहाय्य करतात. या कुजण्याच्या प्रक्रियेमुळे मैलामुक्त पाण्यातील मैल्याचे पाण्यातच विघटन होऊन तो नष्ट तर होतोच. त्याचबरोबर त्या पाण्यातील विषारी घटकही नष्ट होऊन शुद्ध झालेले ते पाणी आपोआपच जमिनीत मुरते. या पाण्याचा जमिनीलाही काही अपाय न होता जमिनीची सुपीकता वाढते. एकदा का हे जीवांमृत सांडपाण्यात सोडले की मग त्या जीवांमृतातील बॅक्टेरिया प्रचंड वेगाने वाढतात. या जीवांमृताच्या शिडकाव्यामुळे डासांची उत्पत्ती कायमस्वरुपी थांबते. कचऱ्यावर हे औषध शिडकले, तर कचऱ्याचे तात्काळ मातीत रुपांतर होते. त्यामुळे या जीवांमृतामुळे दुर्गंधीची समस्या कायमस्वरुपी संपते. यामुळे जलप्रदूषण न होता रोगराईला आळा बसतो तसेच या संशोधनातून प्रदूषणमुक्ती होणार आहे. दुर्गंधीमुक्ती सोबतच जीवांमृत निर्मितीच्या माध्यमातून अनेकासाठी रोजगार निर्मितीचा मार्ग ठरू शकतो.