महाराष्ट्रात 2000 पेक्षा अधिक बिबट्यांचा घरोबा
देशात तेरा हजारचे वर बिबट : प्रथम पसंती मध्यप्रदेशला
महाराष्ट्रात 2000 च्या वर बिबट्यांचा घरोबा
देशात तेरा हजारचे वर बिबट : प्रथम पसंती मध्यप्रदेशला
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकताच देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला.
यात देशात बिबट्यांची संख्या अंदाजे 13 हजार 874 असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. अहवालानुसार महाराष्ट्रात 1985 बिबट्यांचा घरोबा असल्याचे पुढे आले आहे. पण प्रत्यक्षात प्रादेशिक वन क्षेत्रातील बिबटची प्रगणना केल्यास ही संख्या 2000 पेक्षा अधिक होऊ शकते. सन 2018 साली देशात एकूण 12 हजार 853 बिबट होते तर 2022 साली त्यात वाढ होऊन ही संख्या 13 हजार 874 एवढी झाली आहे.
देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांच्या प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित करण्यात आला. हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे. सन 2018 मध्ये 1690 बिबट मोजल्या गेले. नवीन प्रगणनेत 122 बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे. विदर्भातील पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांच्या अधिवासाची घनता २०१८ च्या तुलनेत वाढली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्या अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) बिबट्याच्या लोकसंख्येच्या अंदाजाच्या पाचव्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण केले . मार्जार कुळातील प्राण्याची स्थिती आणि कल यावर प्रकाश टाकला. कॅमेरा ट्रॅपिंग, अधिवास विश्लेषण आणि लोकसंख्या व्यवस्थापन मॉडेलिंग अर्थात् एखाद्या प्रजातींच्या जोखमीचा अंदाज घेण्यासाठी केलेला अभ्यास, यामधून प्रमाण कुठे किती आहे आणि त्यांचे संवर्धन करण्यात येणारी संभाव्य आव्हाने या विषयी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या फेरीत मांसभक्षक प्राण्यांच्या पाऊलखुणा आणि शिकारीसाठी आवश्यक विपुलतेचा अंदाज लावण्यासाठी 6,41,449 किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचे पायी सर्वेक्षण करण्यात आले.
राज्यनिहाय बिबट्यांची संख्या
मध्य प्रदेश :- 3907
महाराष्ट्र :- 1985
कर्नाटक :- 1879
तामिळनाडू :- 1070
राज्यातील प्रकल्प निहाय बिबटसंख्या
मेळघाट : 233
नवेगाव नागझिरा :- 140
पेंच :- 113
ताडोबा :- 148
सह्याद्री :- 135
बोर :- 45