
भीमाबाईंचं पुस्तकाचं हॉटेल
मुंबई ते आग्रा महामार्गावर प्रवास करतांना नाशिक जवळ तुम्हाला जगातील एक आगळंवेगळं हॉटेल नजरेत पडतं. कारण इथे तुम्ही एखादी मेन्यूची ऑर्डर दिली तर तुम्हाला जेवणापूर्वी किंवा नाश्ता करतांना एक आणखी मेजवानी मिळते. जी आपल्या पोटातील भूकेसह मेंदूची भूक भागविते. हि भूक म्हणजे वाचनाची. 2005 साली एका छोट्याशा टी स्टॉलचे रुपांतर ‘हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’ मध्ये झाले, पण आता सर्वदूर ‘आजीबाईंचे पुस्तकांचे हॉटेल’ म्हणून नवीन ओळख प्राप्त झाली आहे. हे हॉटेल चालविणाऱ्या आजीबाईचे नाव आहे भीमाबाई जोंधळे.
इयत्ता 5 वी शिक्षण झालेल्या भीमाआजीचे जीवन संघर्षाचे आहे. लग्न झालं तेंव्हा सासरी 10 एकर शेती असतांना पतीच्या व्यसनामुळे केवळ 2 एकर शेत उरली. लग्नानंतर एक मुलगी व एक मुलगा असतांना त्याचं भविष्य उज्वल व्हावं म्हणून चहाची टपरी टाकली. हळूहळू छोटेशी खानावळ सुरु केली. सोबत मुलाला पेपरची एजन्सी सुरु करून दिली. या खानावळ रुपी हॉटेल सुरु असतांना ऑर्डर पूर्ण होईपर्यंत अनेकजण मोबाईल मध्ये गुंग दिसायचे. त्यामुळे सुरुवातीला 25 -30 पुस्तके ठेवली. आता या हॉटेल मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील मिळून तब्बल 5000 पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. सवयी बद्दल बोलू काही, आई, वाईज एंड अदर वाईज, संत ज्ञानेश्वर आदी पुस्तकांसह डॉ.अब्दुल कलाम पासून सुंदर पिचाई पर्यंत सर्वच प्रकारची पुस्तकं इथे बघायला मिळतात. हॉटेल मधील अर्धा भाग हा वाचनालय साठी तर अर्धा भाग हा हॉटेल म्हणून वापरात आहे. जेवण किंवा नाश्ताची ऑर्डर पूर्ण होईपर्यंत पुस्तक आपली मेंदूची भूक भागवते. पिठलं भाकर हि या हॉटेल विशेष मेजवानी.
वाचन संस्कृतीचे विविधांगी उपक्रम :-
आजींच्या हॉटेल मध्ये पुस्तके वाचायला तसेच सवलतीत विक्रीला सुद्धा उपलब्ध आहे. त्यांच्या हॉटेल मध्ये वाढदिवस असला कि त्या ग्राहकांना पुस्तक गिफ्ट देतात. वाचन संस्कृती वाढावी म्हणून महिला दिन, वाचन प्रेरणा दिन, प्रजासत्ताक दिनाला जेवणा सोबत पुस्तक भेट देतात. त्यांच्या हॉटेल मध्ये एक भिंत कविता साठी राखीव आहे. त्या रुग्णभेटी दरम्यान पुस्तके भेट देतात. शिवाय आश्रमशाळा, महाविद्यालय यांना पण अनेकदा पुस्तके भेट दिली आहे. त्यांच्या या कार्यांपासून प्रेरणा घेत अनेकजण आजीबाईंच्या हॉटेलला पुस्तके दान देतात. भीमा बाईंच्या या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘नारीशक्ती अवार्ड सह इतर 10 राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले आहे.
आजींचा सल्ला :-
विठ्ठलाची भक्त असलेल्या भीमा आजीला अजूनही चष्मा लागलेला नाही किंवा ना कधी डॉक्टरांकडे जाऊन भरती व्हावे लागले. पुस्तक माणसाची बुद्धी चंचल बनवतात त्यामुळे वाढदिवसाला तोंडाला केक फासणेऐवजी पुस्तक भेट व मोबाईल व्यसन कमी करून पुस्तक वाचण्याचा सल्ला त्या आजच्या युवापिढीला देतात.