आता AI शोधणार वनवणवा
देशातील पहिला प्रयोग पेंच व्याघ्र प्रकल्पात
उन्हाळ्यात सर्वाधिक वनवणव्याच्या घटना घडतात. साधारण मध्य भारतात दरवर्षी पंचवीस हजाराच्या आसपास वनवणव्याच्या घटना शासकीय कागदावर उमटतात. भारतात पहिल्यांदा पेंच व्याघ्र प्रकल्पात वनवणव्यासाठी AI चा वापर केल्या जाणार आहे.
पेंच टायगर प्रोजेक्टमध्ये एआय बेस्ड १२ व्यावसायिक सॅटेलाईट चा वापर केल्या जाणार आहे. सातपुडा फाऊंडेशन अमरावती व पेंच वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे तंत्रज्ञान बसविले जात आहे. AI बेस्ड संदेशामुळे वणवा लागल्यावर अगदी 2 रे 3 मिनिटात घटना कुठे घडली, केंव्हा घडली हि खबर आता वनविभाग पासून सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहचणार आहे. यामुळे कमी वेळात वणव्याच्या जागेचा शोध, झालेले नुकसान ,आगीचे कारण, अचूक आकडेवारी शिवाय 360 कॅमेरामुळे आग लावणारा व्यक्ती तिसऱ्या डोळ्यात कैद होणार आहे. कमी वेळेत अचूक माहिती प्राप्त होत असल्याने अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार शिवाय वनसंपदेचे संभाव्य मोठे नुकसान टळणार आहे.
अशी कळणार तत्काळ माहिती :-
पेंचच्या जंगलात वणव्याचा धूर ओळखण्यासाठी उंच ठिकाणावर वर्तुळाकार नजर ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात येणार आहे . एका कॅमेराद्वारे सुमारे 15 किमीचा भाग कव्हर होणार आहे. रेडिओ फ्रिकवेंसी द्वारा आगीचा धूर व धुक्यातील फरक हे तंत्रज्ञान अचूक ओळखणार आहे तसेच रात्रीच्या अंधारात सुध्दा धूराचा तपकिरी रंग हा प्री लोडेड डेटावरून अचूकतेने ओळखणार आहे. ब्राझील देशात जंगलात वणवा आटोक्यात आणण्यासाठी उमराव मियों व अमेझॉन च्या जंगलातील पँतोरा या तंत्रज्ञानाद्वारा वणव्याचे लोकेशन प्राप्त केल्या जात होते. या दोन्हींचा अनुभव पेंच व्याघ्र प्रकल्पातील AI मध्ये केल्या जाणार आहे. AI मुळे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाहून तत्काळ AI सॅटेलाईट ला संदेश पाठविणार असल्याने कंट्रोल रूम द्वारा संबधित वनविभाग च्या यंत्रणेला 2 ते 3 मिनिटांत संदेश मिळणार आहे. वनविभागच्या व्हॉटस् अप ग्रुप वर फिल्ड डायरेक्टर पासून ते वनमजुर असल्याने तत्काळ यंत्रणा ऍक्शन मोडवर येणार असल्याने पूर्वीच्या तुलनेत कमी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. यांच्याद्वारे पेंच कोअर व बफर झोन मधील सुमारे पावणे आठशे चौरस किमी भाग सुरक्षित होणार आहे.
अचूक आकडेवारी कळणार -:-
या तंत्रज्ञानाने कमी वेळात वणव्याच्या जागेचा शोध, झालेले नुकसान, विविध आकडेवारी ही कमी वेळेत अचूकतेने प्राप्त होणार आहे. यामुळे अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले.