
….तर चक्क हत्ती घरी यायचा
गजराजचा सारथी – रघुनाथ चैत्या पंडोले
जंगली हत्ती हिंस्त्र प्राणी आहे याचे अनेक दाखले लोकं सांगतात पण हा प्राणी तितकाच मायाळू आहे. संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे अनेक भाविकांनी हत्ती बघितले आहे. प्रत्येक आरती च्या वेळेस हत्ती मंदिरात हजर रहायचा. याच हत्तीला जेंव्हा भूक अनावर होते तेंव्हा हा अन्नदात्याच्या उंबरठ्यावर उभा राहून ‘मला खायला द्या’ अशी आर्जव सुद्धा करतो हा किस्सा सांगितला हा कोलखास येथील सेवानिवृत्त माहूत रघुनाथ चैत्या पंडोले यांनी.
सातपुडा पर्वतच्या रांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात जेव्हा एखादे वाहन चालू शकत नाही तेंव्हा आठवण येते ती गजराज अर्थात हत्तींची. मेळघाटात 1972 किंवा त्यापूर्वी पासून हत्तीचे वास्तव्य आहे. ज्या भागात ट्रक जात नाही तेथील अवजड वाहतुकीसाठी, गस्तीसाठी, पाणवठा, वणवणवा दरम्यान हत्तीचा वापर केला जायचा. जंगलातील असा कोणताही भाग नाही जिथे हत्ती जावू शकत नाही. नदी, नाले, डोंगर, पहाड आदी सर्वत्र हा सहज संचार करतात. पूर्वी कोहा-कुंड सारख्या भागात गस्ती व फिरस्तीसाठी चंपाकली व धारगड सारख्या कोअर भागात पाणवठा निरीक्षण व गस्तीसाठी लक्ष्मीचा वावर असायचा. जारीदा, चिखलदरा, ढाकणा, धारगड, सिमाडोह, रायपुर, चौराकुंड आदी भागात हत्तींचा राबता असायचा. यात महत्वाची भूमिका राहते ती हत्तीच्या सारथीची. रघुनाथ चैत्या पंडोले हे माहूत या पदावर 37 वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले असून त्यांनी हत्तींच्या अनेक आठवणी निसर्ग दर्पणला सांगितल्या आहे.

हत्तींना मृत्युदंड :–
हत्ती तसा बघायला गेलो तर शांत प्राणी आहे पण एखादेवेळी तंत्र बिघडले तर न आटपणारा. साधारण 2007 च्या काळात भोलाप्रसाद नावाचा एक रांगडा हत्ती होता. एकदा त्याने त्याच्या सेवेत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्याला आपला हिसका देत त्याला यमसदनी पाठविले. त्याला नंतर भोलाला चोपन रंगुबेली भागात पाठविले. एकदा तर त्याने चक्क धारणी -परतवाडा रस्ता ब्लॉक केला. शेवटी त्याला बेशुद्ध करावे लागले पण नंतर त्याच्या वर्तवणूकीत सुधारणा न झाल्याने मृत्युदंडची कठोर शिक्षा दिल्या गेली. याच प्रमाणे रायपुर इथे जन्मलेल्या ‘गजू’ नावाच्या हत्तीवर सुद्धा मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविल्याने त्याची रवानगी गडचिरोलीच्या आलापल्ली जंगलात करण्यात आली. 1975 मध्ये माहुतावर हल्ला चढविल्याने व त्याच्या वर्तनात सुधार न झाल्याने त्यालासुद्धा मृत्युदंड देण्यात आला.
चंपाकली व सुंदरमाला या दोन हत्तींनी अनेक व्हीआयपीचे दर्शन घेतले आहे. केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री यांचा मेळघाट दौरा असला कि ह्या हत्ती त्या ताफ्यात असायच्या. राज्यपाल सी.सुब्रमण्यम व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी चंपाकली वर सफारी केली आहे. हत्तींचा दिनक्रम ठरला असतो. हत्तींना भूक लागली तर प्रसंगी घरी सुद्धा अनेकदा हत्ती आठवण करून द्यायला येतो. माहुतांशी हत्तीची भावनिक नाळ जुळते. जंगलात 50 मानसं कामी पडणार नाही पण एक हत्ती तुमची कठीण प्रसंगात सुद्धा साथ सोडत नसल्याचे रघुनाथ पंडोले सांगतात.