विठ्ठलाचे आवडीचे गोविंद फळ
विठ्ठलाचे आवडीचे गोविंद फळ
वाघाटीची भाजी अनेक आजारांवर गुणकारी
आषाढी एकादशीच्या पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसह राज्यभरात पांडुरंगाचे लाखो भाविक उपवास करतात. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ‘गोविंद फळ’ अर्थात वाघाट्याची भाजी खाण्याची जुनी परंपरा आहे. गोविंद फळाची भाजी खाऊन आषाढी एकादशीचा उपवास सोडला जातो. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून सुमारे आठवडाभर हे फळ बाजारात मिळतं.
वाघाट्याचा वेल शेताचे कुंपण, डोंगरमाथा तसेच जंगलात आढळते. गोविंद फळाच्या वेलीला वाघाच्या नखासारखे काटे असतात. अनेकदा संपूर्ण वृक्ष या वेलीने व्यापते. गोविंद फळ हे खायला अतिशय कडू असल्यामुळं या फळाची भाजी बनवून ती खावी. वर्षातून एकदा येणारं हे फळ खाल्ल्यामुळं वर्षभर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. सुरुवातीच्या अवस्थेत गोविंद फळ हे लिंबासारखे भासतात. काही दिवसांनी मोठं झाल्यावर जणू वेलीवर पेरूच लागलं की काय असा भास होतो. गोविंद फळ खायला अतिशय कडू असून हे फळ खाणं तितकंसं सोपं नाही. यामुळं गोविंद फळाची छान भाजी करूनच ते खाणं शक्य आहे.
औषधीय उपयोग :-
वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे. श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे, डोके आणि चेहऱ्यावरील चेतापेशीत तीव्र वेदना होणे, लहान मुलांमध्ये वाऱ्यांमुळे निर्माण होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात कंट सुटणे व दुखणे, विषारी द्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळने, ताप उतरवणे, हगवण लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर, सर्दी, खोकला, अनेक विषाणुजन्य आजार, पित्तनाशक ,वातहारक याच बरोबर अनेक प्रजातींच्या कृमिचा नाश होण्यासाठी वाघाटीची फळे, पाने व मुळे यांचा वापर केला जातो. नागीन या आजारावर गोविंद फळ अतिशय महत्त्वाचं औषध आहे.
गोविंद फळ का म्हटलं जात ? :
महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात जंगलाच्या ठिकाणी गोविंद फळ मिळतं. राज्याच्या बऱ्याच भागातून पंढरपूरकडे जाणारे वारकरी स्वतःसोबत गोविंद फळ सोबत घेतात. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणी अनेक भाविक गोविंद फळ वाहतात. पांडुरंगाला हे फळ अर्पण केलं जाते. त्यामुळे या फळाला ‘गोविंद फळ’ असं म्हटलं जातं. आषाढी एकादशी हि पावसाळ्यात येत असल्याने या काळात विविध आजारांची लागण होते. या गोविंद फळामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असल्याने हे फळ पावसाळी दिवसात खाण्याचे महत्व प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी याला कान्होपात्राचे झाड म्हटल्याचे समोर आले आहे.
खुप छान लेख गोविंद फळांचा श्रीनाथ सर
खुप सुंदर माहिती वरचेवर मिळत राहते