बेलकुंड : अखेरचा हा तुला दंडवत
बेलकुंड : अखेरचा हा तुला दंडवत
बेलकुंड ही मेळघाटच्या अरण्यातील एक वास्तू नसून माझ्या साठी ते एक प्रेरणा स्थान आहे. गत 4 दशकांपासून जंगल भटकंतीत या वन विश्रामगृहावर कित्येक मुक्काम झाले. या परिसरातील समृद्ध वन, वन्यजीव यावर लेखनास चालना मिळाली. एवढेच नव्हेतर माझ्या 11 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘पडाव : रानावनातील ब्रिटिशकालीन विश्रामगृहे’ या पुस्तकाची आयडिया मला येथूनच मिळाली. पुस्तकात बेलकुंडवरही एक प्रकरण आहे. विविध वनसंशोधकांनी या भागात दुर्मिळ वनस्पतींचा शोध लावला. तर काही तज्ञांनी दुर्मिळ पक्ष्यांचा शोध लावला. मी आमच्या मित्र मंडळी सोबत या विश्राम गृहाचा शंभरावा आणि 125 वा वाढदिवसही साजरा केला. बाजूने रस्त्यावर 1886 साली बांधलेला पूल अजूनही 140 व्या वर्षीही शाबूत आहे. मात्र 1891 साली ब्रिटिशांनी बांधलेल्या या विश्राम गृहावर अवकळा आली आणि जवळपास 15 वर्षांपूर्वी हे विश्राम गृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे? यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्याच्या निकालासाठी जवळपास एक दशकाचा कालावधी गेला आणि त्यानंतर निकाल लागून हे विश्राम गृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यानच्या काळात या 133 वर्षं जुन्या विश्राम गृहाची पडझड झाली. एक प्रकारे वस्त्र हरणच झाले. दहा वर्ष हे विश्राम गृह बंदच होते. त्यानंतर गेल्या जवळपास पाच वर्षांपूर्वी या विश्राम गृहाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने नुतनीकरण केले आणि केवळ त्यांच्याच अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी ते खुले करण्यात आले. इतरांसाठी रस्त्याच्या कडेने असलेल्या फाटकाला भले मोठे कुलुप लावण्यात आले आहे. मी स्वतः अलीकडे काही वर्षांत जवळपास चार-पाच वेळा जावून आलो. प्रत्येक वेळी फाटक बंदच आढळून आले. मात्र गेल्या 2 मार्च रोजी मेळघाट भटकंतीत बेलकुंड विश्राम गृहाच्या दर्शनाचा योग आला. फाटक उघडे दिसले आणि पळतच जाऊन आनंदाने विश्राम गृहाचे बाहेरूनच दर्शन घेतले. छायाचित्र काढले आणि त्याला नमन करुन म्हटले – ‘बेलकुंडा कदाचित माझा अखेरचा हा तुला द़ंडवत असावा! ‘ –
प्र.सु. हिरुरकर
वन्यजीव अभ्यासक अमरावती