मेळघाटात होणार साहसी पर्यटन

मेळघाटात होणार साहसी पर्यटन
मेळघाट यावर्षी आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करत आहे. या वर्षात पर्यटकांना मेळघाट भ्रमंती व पर्यटन आणखी साहसी व आकर्षक होण्यासाठी वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने स्काय सायकलिंग, स्विस टेंट, ह्युमन गायरो राईड,क्लायबिंग वॉल,झिपलाईन ,रँपलिंग आणि ईतर साहसी क्रीडा प्रकार अनुभवला मिळणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने सुमारे २२ कोटीचा आराखडा मंजूर केला आहे.
रात्रीचे वन्यप्राणी व जंगलातील थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी कुंभी, पोपटखेड, हरिसाल, चिखलदरा लॉंग पॉइंट इथे पर्यटकांसाठी नव्याने मचाण उभारले जाणार आहे. चिखलदरा पायथ्याला लागून असलेल्या आमझरी परिसरात चिखलदरा ते मेंढादेव धबधबा दरम्यान साडे तीन किमीचा जंगल भ्रमंती अनुभवाला मिळणार आहे. आमझरी येथे यापूर्वी रोप वे सारख्या साहसी खेळांचा समावेश आहे. मेळघाट मध्ये सन २०१७-१८ मध्ये सुमारे ५४ हजार पर्यटकांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पला भेट दिली यातून ७२ लक्ष रुपयाचा महसूल सरकारला प्राप्त झाला. हीच संख्या २०२२-२३ मध्ये वाढली असून पर्यटनाच्या माध्यमातून सुमारे सव्वा तीन करोड रुपये सरकार दरबारी जमा झाले आहे. चिखलदरा येथे मान्सून काळात होणारी गर्दी बघता भीमकुंड परिसरात स्काय सायकलिंग व जायंट स्विंग सारखे साहसी साहित्य येथे लावले जाणार आहे. गाविलगड किल्ला हा चिखलदरा येथील आगळीवेगळी शान आहे. पर्यटकांमध्ये किल्ला भ्रमंती व रुची निर्माण होण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासह पर्यटकांसाठी बोरी येथे औषधीय वनस्पती बगीचा निर्माण, धारणी येथे बांबू गार्डन, हिराबंबई येथे बोटिंग व निसर्ग भ्रमंती, गोलाई धबधबा भ्रमंती, शहापूर येथे सफारी वाहन सुविधा, सुलाई नाला धबधबा पर्यटन, भीमकुंड येथे स्काय सायकल व स्विंग तसेच माखला येथे कलश श्रुंखला पॉइंट विकास, जंगल सफारी रोडचे पुनर्निर्माण, विविध ठिकाणी सूचना फलक व पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहे.