
सेवानिवृत्तीनंतरही म्हणतात ‘गुड मॉर्निंग ‘
गोपाळ यावले यांचे अनोखे शिक्षा दान
शिक्षक दिन विशेष :-
एकदा का कार्यालयातून शाल व श्रीफळ मिळाले की सहसा कोणीही आपल्या सेवेच्या ठिकाणी फारसं फिरकत नाही. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य गोपाळ यावले हे मात्र या बाबीला अपवाद ठरले आहे. सेवानिवृत्तीच्या दहा वर्षानंतर सुध्दा ते आपल्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग स्टुडंट असे म्हणत शिक्षा दानाचे कार्य करत आहे.
श्रीकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर हे चांदूर रेल्वे तालुक्यातील एक नावाजलेली शाळा. या शाळेवर सन 1979- 80 सत्रात गणित शिक्षक म्हणून रुजू झालेले गोपाळ यावले यांनी आपल्या अध्यापनाचे शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला. कला, चित्रकला, स्वच्छता व बाग बगीचा ची आवड असलेल्या यावले सरांनी शाळा चहूबाजूनी हिरवीगार केली. याच दरम्यान तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्षपद सांभाळले. तालुक्यात दर्जेदार पद्धतीने विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. पुढे सन 2006 ते 2014 या काळात शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली. या सह चांदूर रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुद्धा मोठ्या डौलाने सांभाळले.
तंत्रस्नेही मुख्याध्यापक :-
तालुक्यातील कोणत्याही खाजगी शाळेला कोणतीही शैक्षणिक अडचण आली तर यावले सर स्वतः पुढाकार घेत. वयाच्या 57 व्या वर्षात शिष्यवृत्ती सह अन्य ऑनलाईन कामे शिकण्याची जिद्द त्यांच्यात होती. एकीकडे आपल्या सहकारी शिक्षकाला ‘हा विषय तुम्ही पाहून घेणे’ च्या काळात मुख्याध्यापक म्हणून माझी हि जबाबदारी आहे असे म्हणत काम स्वीकारणारे प्राचार्य म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला. चित्रकला व गणित विषयाची आवड असल्याने मुख्याध्यापक झाल्यानंतरसुद्धा त्यांनी कधी खडू सोडला नाही . त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारा एनएमएमएस. (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) परीक्षा सुरु झाली. या परीक्षेत तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी आजही श्रीकृष्ण विद्यालयाचे निवडल्या जातात याचे श्रेय सुद्धा यावले सरांना जाते. कारण त्यांनी सुरु केली मार्गदर्शनाची परंपरा आजतागत अविरत सुरु आहे. आताचे शिक्षक सुद्धा ह्या परीक्षेसाठी तेवढेच परिश्रम घेत आहे. वरिष्ठ कार्यालयाने कुठलेही प्रशिक्षण किंवा कार्यशाळा आयोजित करण्यासाठी श्रीकृष्ण विद्यालयाला प्राधान्य दिल्या द्यायचे त्याचे कारण म्हणजे या शाळेतील शिस्त व व्यवस्थापन.
सेवानिवृत्तीची सेवा :-
आमला विश्वेश्वर सारख्या खेडेगावात शहरा सारखी सुंदर व स्वच्छ कॉलनी आहे. प्रत्येक घरासमोर हिरवागार परिसर आहे. ‘खेड्यात शहराचा फील’ निर्माण करण्यात यावले सरांचा पुढाकार होता. कुठल्याही फळाची किंवा पैशाची अपेक्षा न धरता गावातील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावे म्हणून दरवर्षी संस्कार शिबिराचे आयोजन त्यांनी केले. यात योग प्राणायाम, ज्ञानसाधना आदी विषयावर ते मार्गदर्शन करतात.
सध्या शासन बेरोजगार युवकांना सोडून शाळा अध्यापनासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नियुक्ती देत आहे. मात्र कुठल्याही मान किंवा धनाची अपेक्षा न करता 2014 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आजही खडू घेवून गणित व चित्रकलेचे धडे देत आहे. आजच्या व्यावसायिकरणाच्या काळात सुद्धा सरांनी गुरु-शिष्याची परंपरा कायम तेवत विद्यादानाचा यज्ञ अखंड तेवत ठेवला आहे याकरिता सरांना मानाचा मुजरा.
विद्यार्थीहित जोपासणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.