नववर्षाचा शुभारंभ – गुढीपाडवा

नववर्षाचा शुभारंभ – गुढीपाडवा
तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे, तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. लाकूड या अर्थाने तेलगू तील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू किंवा काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश म्हणजे पाडवा. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद् प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ”चैत्रपाडवा” व गुढी उभारतात म्हणून गुढीपाडवा.
सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला, तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरवात झाली. सातवाहन राजाच्या राज्यातील हि कालगणना आजही गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात प्रचलित आहे. आपले विविध सण, समारंभ,उत्सव हे निसर्गावर आधारित आहे. याचा पुरावा म्हणजे आदिवासी संस्कृती. आजही आदिवासी समाजातील सण,उत्सव बघितल्यास त्यात बहुतांश निसर्गाचा समावेश आहे. अगदी वाघ, नाग सारख्या प्राण्यांच्या पूजेसह मोह, साग सारख्या विविध वनस्पती पूजनाचा समावेश त्यांच्या विविध उत्सवादरम्यान बघायला मिळतो. आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य-चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा-अर्चा करायचे त्यातूनच या गुढीपाडवा सारख्या सणाचा शुभ्रारंभ बघायला मिळतो. पराक्रम ,विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढी पाडवा. बांबूच्या काठीवर साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी म्हणजे जणू वसुंधरेचे प्रतीकच. चैत्र महिन्यानंतर शेतकरी हा नव्या पेरणीसाठी आपले शेत शिवार तयार करीत असतो तेव्हा शेतीची प्राथमिक कामे, शेताची साफसफाई व नवपेरणीच्या दृष्टिकोनातून कामाचे नियोजन, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या दिवशी संपूर्ण नियोजन करीत असतात. अयोद्धा नरेश प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.