पोळ्याच्या झडत्या
बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा,अमरावती,अकोला या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो. वर्तमानातील समस्या, राजकारण, व्यक्ती, महागाई, भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते. गेली तीन वर्षे झडत्या पीएम, सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडल्या जात आहेत. यावर्षी पीककर्ज माफी, लाडकी बहिण, लाडका भाऊ दुष्काळ हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदनेला व्यंगातून व्यक्त करतात.
खांदशेकणीचे आवतन दिल्यावर पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना नदी, नाल्यावर स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर नवीन झूल चढवितात. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. गळ्यात घुंगराच्या, कवड्यांच्या माळा घालतात, गळ्यातील दोर व वेसन बदलविण्यात येते. बेगड, गेरूने शरीरभर ठप्पे मारले जातात. सजविलेले बैल मारुतीच्या मंदिरापुढे नेवून देवदर्शन घेतात. दुपारी तोरणाखाली पोळा भरवला जातो. त्यांना खास पुरणपोळीचा पाहुणचार दिला जातो. शेतातील गडी माणसांनाही धोतर, बंडी असे नवीन कपडे देण्याची प्रथा आहे. पोळा फुटण्यापूर्वी गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरूवात करतो.
शहरी भागात मोबाईलवर झडती :-
शहरी भागात स्थिरावलेले आजचे चाळीस ते साठीतील नागरिक गावातील पोळ्यांना मिस करतात. ज्यांचा अजून खेड्यातील घराशी टच आहे ते पोळ्याला आवर्जून गावात हजेरी लावतात, पण जे पूर्णतः शहरी झाले आहे ते मात्र व्हॉटस् अप ग्रुप वर झडत्यांची निर्मिती करून आपल्या बालमित्र व मित्रपरिवारसह आनंद घेतात. या निमित्याने गावातील पुरणपोळी, बैलांचा साज, झडत्या ,भांडण व ईतर स्मृतींना उजाळा दिला जातो.
लेख सौजन्य :- नितीन पखाले, यवतमाळ (2017 FB)
2024 मध्ये समाज माध्यम वर वायरल होत असलेल्या काही झडत्या
कवी गंगाधर मुटे यांची झडती.
बैना ओ बैना, लाडाची बहिणाला
लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना
पंधराशे रुपयाचे खावा गोलगप्पे
लाडाच्या भावाला द्या ठपाठप ठप्पे.
—————————————————
लाडक्या बहिणीला पंधराशेचा महिना,
कास्तकरांची कायमच होते दैना,
बेरोजगारांच्या चुप्पीसाठी दिला,
लाडक्याना 10 हजाराचा महिना.
——————————————————–
वऱ्हाडी झडती कारण नितीन वसंतराव कोल्हे (बोरी अरब) यांच्या काही झडत्या
सलाईन रे सलाईन,
सरकारचा सलाईन,
मुख्यमंत्र्याची आता,
लाडकी झाली हो बहीण.
——————————————————–
बहिणीच्या लाडात,
लंबा झाला हो दाजी,
कापूस सोयाबीन ले नाही भाव,
बहिणीची हाय हाजी हाजी.
——————————————————–
राजकारणाचा रंग,
झाला म्हणते हो गुलाबी,
पैशाचीच माया
अन पैशाचीच खराबी.
——————————————————–
बदलापूर घटनेवर आधारित काही खास ओळी.
शंकरा रे शंकरा,
उघड तिसरा डोया,
लेखी बाईवर नजर ज्याची,
त्याच्या बुडात घाल गा गोया.
——————————————————–
मेणबत्ती नको ताई,
तलवार घे हाती,
महाकाली होऊन,
चिरून टाक छाती.