….अन चिऊताईचं घरटं हरवलं
….अन चिऊताईचं घरटं हरवलं
एक होती चिऊ नी एक होता काऊ …ही गोष्ट बहुतांश लोकांनी आपल्या बाल्यावस्थेत अनुभवली. अनेकांना पक्षी ओळखता येत नाही पण चिमणी व कावळ्याची ओळख नसेल असा एक व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. चिमणी तसा बघितला तर सर्वत्र आढळणारा पक्षी. आता झोपेतून उठल्यावर टिटवीचा आवाज येत असला तरी पूर्वी चिमण्या आपल्याला झोपेतून उठवायच्या. आपल्या घरात व शेजारी आढळणारी चिऊताई आपल्या पासून नाराज आहे. त्याला कारणही तसेच आहे. पूर्वी आपली घरे मातीची असल्याने ते चिऊताईचे हक्काचे ठिकाण होते. शहरात माती दिसणे हळूहळू कमी होत असल्याने चिमण्यांचा अधिवास नष्ट होत आहे.
चिमण्या पाण्यात जश्या अंघोळ करून ताज्यातवान्या होतात तश्याच त्या त्यांच्या मिलन काळात मातीने अंघोळ करतात. त्यांच्या विणीसाठी हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे माती आणि त्यांचे नाते अतूट आहे. आधुनिक जीवनशैली मुळे माती ऐवजी सिमेंटची घरे आली, एसी आल्यामुळे खिडक्या बंद झाल्या. मच्छर वाढल्याने दाराला नेट लागली पर्यायाने चिमणीला आपल्या घरातील प्रवेश बंद झाला. एरव्ही आपल्या घरात खिडकी, पंखा,वीज मीटर आदीवर घरटे करणारी चिमणी आपल्या पॉश घरट्यामुळे ती परकी झाली. शहरात गाड्यांचे प्रमाण वाढले त्यामुळे हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढल्याने चिमण्यांचा श्वास शहरात कोंडायला लागला. हे ही एवढे थोडके कि काय त्यात मोबाईलची भर पडली आणि वायरलेसमुळे ती काँटॅक्टलेस झाली. त्यामुळे शहरीकरणात तिची गुंज हरवू लागली.
पक्ष्यांचा अभ्यास करतांना सुद्धा चिमणी चे मापदंड उपयोगात आणले जाते.चिमणीचा मिलन काळ हा वर्षभर असतो.एक वर्षात अंदाजे तीन ते चार वेळा अंडी देतात. चिमण्यांना घरटी करण्यासाठी गवत व इतर नैसर्गिक काडीकचरा लागतो. शहरात गवत अतिशय कमी प्रमाणात आहे. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंडी’च्या तापमानात नैसर्गिकरित्या नियमन होते. त्यामुळे त्यांचा प्रजनन दर वाढतो. मात्र गवत नसल्यामुळे त्यांना इतर वस्तूपासून घरटे करावे लागत आहे. नैसर्गिक वस्तू जसे गवत उलपब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या भावी पिढीवरही याचा वाईट परिणाम होतो.खेड्यात सुद्धा रासायनिक खतांच्या वापराचा विपरीत परिणाम चिमण्यांच्या प्रकृतीवर होऊ लागला.
आपण त्यांच्यासाठी मातीची, लाकडाची घरटी व उन्हाळ्यात पाणी ठेऊया. आपल्या घरातील परसबागेत, विजेच्या मीटरवर, खिडकीत घरटे केल्यास ते न काढता त्यांना आश्रय देऊया. सांस्कृतिक वारसा, जैवविविधतेत महत्वाचे स्थान आणि पर्यावरण संतुलनात आणि आपल्या अस्तित्वासाठी पक्षी व इतर जीवन महत्वाचे आहेत. निसर्ग आणि निसर्गातले हे जीवन टिकले तरच आपल् अस्तित्व कायम असणार आहे. म्हणून त्यांना अभय देऊन आपण आपलंच संवर्धन करुया. आज २० मार्च जागतिक चिमणी दिवस आहे. चला तर मग चिऊताईचा वाढदिवस साजरा करुया.