जागतिक वन दिवस
जागतिक वन दिवस
जागतिक वन दिन हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो. वनांचा मानवी जिवनाशी असलेला संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते, जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे. आज जंगलांनी जगाच्या ३०% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात ६०,००० पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती या अज्ञात आहेत. भारतासारख्या कृषिप्रधान देशात तर वनांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे. हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते.
जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. यावर्षी वन आणि नाविन्य : नवीन जगासाठी उत्तम उपाय हि २०२४ या वर्षाची थीम आहे.