बहुगुणी शिंदी (Wild date palm)
बहुगुणी शिंदी (Wild date palm)
शिंदीला खजुरी, शिंदी ताड असेही म्हणतात. ताड, माड, सुपारी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ येथे आढळतो. हि वनस्पती बहुधा तो ओलसर गाळ असलेल्या जमिनीत, ओढ्यानाल्यांच्या काठी वाढलेला दिसून येतो. वृक्षाची उंची दहा ते पंधरा मीटर असते. शिंदीच्या वृक्षाला फांद्या क्वचितच दिसतात. गळून पडलेल्या पानांच्या देठांच्या वणांमुळे खोड खरबरीत दिसते. पाने संयुक्त, एकाआड एक, मोठी व 3 ते 5 मीटर लांब असतात. पानांचे देठ लांब असून त्यांवर काटे असतात. शिंदीचे नर आणि मादीचे वृक्ष वेगळे असतात. दोन्हींवर फेब्रुवारी ते मे महिन्यात 8 ते 10 फुलोरे येतात. नर फुले दाटीने येतात, पण मादी फुले विरळ असतात. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान फळे पक्व होतात. शिंदीचा वृक्ष कोणीही मुद्दामहून लावत नाही. फळावरील खाण्यायोग्य गर फार कमी असतो. पण पक्षी, लहान मुलांचे ते आवडते खाद्य आहे. अनेक पक्षी घरट्यासाठी शिंदीला प्राधान्य देतात. दुष्काळात याचा बुंधा खावून लोकांनी आपला उदरनिर्वाह केला होता. किडनी च्या आजारावर सुद्धा शिंदी उपयोगी ठरत असल्याचे जाणकार सांगतात.
शिंदीची प्रसिद्ध पेय :-
शिंदीच्या खोडावर खाच पाडून त्यातून पाझरणारा रस मडक्यांमध्ये गोळा करतात. यापासून नीरा हे पेय बनविल्या जाते. नीरा हे पेय शरिराला अतिशय चांगले असत. विशेषत: उन्हाळ्यात नीरा पिण्यासाठी वापरला जातो. शिवाय यापासून मद्य सुद्धा तयार केले जाते. शिंदिपासून तरटी, गूळ व जेली ,मुरंबा, जेली, शिर्का तयार करतात. म्हणजेच हे वृक्ष आर्थिक उत्पन्नाचे चांगले स्त्रोत आहे.
शिंदीचे ईतर उपयोग :-
ह्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग छपरे, चटया, हातपंखे, टोपल्या, पिशव्या, झाडू, केरसुण्या, मासे पकडण्याची जाळी गवताचे भारे बांधणे इ. तयार करण्यासाठी होतो. देठ आणि मध्यशिरांचा उपयोग दोर बनवण्यासाठी करतात. खोड कठीण असून त्यापासून डिंक मिळतो. मेळघाटात या पानापासून विविधांगी सुंदर मुकुट तयार केला जातो. चिखलदरा बाहेर पडतांना अनेक पर्यटकांच्या शिरपेचात हा मुकुट आवर्जून बघायला मिळतो. दिवाळी सणात शिंदीच्या पानापासून बनविलेल्या फळ्याना मोठा मान असतो.
Informative articles.
Thank You Sir