जिल्हा परिषद शिक्षकाचे अनोखे‘जलपान रथ’
जिल्हा परिषद शिक्षकाचे अनोखे ‘जलपान रथ’
नाशिक जिल्ह्यातील दहिदी (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सतीश मांडवडे यांनी वडील स्व. जयवंतराव मांडवडे यांच्या स्मरणार्थ मुक्या जिवांसाठी अनोखे जलपान उभारले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी माणसांसाठी पानपोई लावल्या जाते मात्र मुक्या प्राण्यांचे काय ? हा विचार आला नि मालेगावच्या माळमाथा व काटवन या अवर्षणग्रस्त भागात पशु पक्ष्यांसाठी पाणवठे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी चक्क गाडी खरेदी करत त्यात पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली. जंगलातील ज्या भागात प्राण्यांचा वावर असतो त्या ठिकाणी खोलगट भागात कृत्रिम पाणवठा निर्माण केला आहे. याकरिता त्यांना मित्रपरिवाराचे सहकार्य मिळत आहे.
कर्करोगावर मात
दोन वर्षापूर्वी सतीश मांडवडे यांना कर्करोग हा गंभीर आजार झाला होता, अतिशय सकारात्मक कृतीद्वारा त्यांनी या आजारावर मात करत आपल्या सामाजिक कार्याचा झपाटा कायम ठेवला आहे. त्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार झाले. ह्यावर सुद्धा त्यांनी मात करत अवघ्या पाच दिवसानंतर आपल्या पाणवठ्याने काम सुरू केले. वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पेश देवरे व पशुवैद्यकीय अधिकारी राकेश अलई व अन्य मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी ‘जलपान’ रथाची सुरुवात केली. जीवनात अतिशय उत्साहाने काम करत कर्करोगासारख्या असाध्य आजारावर देखील मात करता येणे हे त्यांनी सिद्ध केले. यापेक्षा वेगळा आनंद काय असतो. उर्वरित आयुष्य समर्पित भावनेने व्यतित करत असताना शालेय कामकाजासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पाच संगणक व ईतर साहित्य उपलब्ध करून देत संगणक प्रयोगशाळा उभारली. नोकरीच्या गावात मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी असो किंवा ‘आई प्रतिष्ठान चे साहित्य संमेलन, शिक्षक भारती दिनदर्शिका, मराठी साहित्य संघास मदत अशा अनेक संस्थांना त्यांनी मौलिक मदत केली. सतीश मांडवडे यांनी समाजभान जोपासत पर्यावरण रक्षणासह मुक्या प्राण्यांसाठी उभारलेल्या जलपान रथ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तसेच यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.