एक गावं मोराचं -चिंचोली
एक गावं मोराचं -चिंचोली
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. या देशातील व्यक्ती व गावांची नावे पण फार वेगवेगळी आहे. काही गावांची नावे निसर्गातील पाने, फुले, वृक्षांवर वरून ठेवली आहे. काही नावे प्राण्यांच्या नावावरून, काही व्यक्तींच्या आडनावावरून तर काही चक्क पक्ष्यांच्या नावावरून ठेवलेली आहे. महाराष्ट्रातील चिंचोली नावाचे गावं असेच आगळेवेगळे उदाहरण …जे चिंचोली (मोराची) या नावाने सर्वदूर परिचित आहे.
चिंचोली (मोराची) हे गाव आहे पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूरजवळ. शिक्रापूर फाट्यावरून आत गेल्यास हे गाव आपल्याला दिसतं. चिंचोली (मोराची) हे नावाप्रमाणेच गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. गावात भरपूर मोर व चिंचेची झाडे अधिक प्रमाणात असल्याने चिंचोली (मोराची) हे गावाचे नाव पडले. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. सकाळी उठल्या उठल्या दार उघडल्यावर व्हरांड्यात मोराचे दर्शन होते. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो. येथे तुम्ही शेतकर्यांबरोबर शेतात काम करणे, रहाटाने विहिरीतून पाणी काढणे या ग्रामीण जीवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. येथे येऊन हुर्डा पार्टीचा आनंदही घेऊ शकता. गावाकडील चुलीवरची भाकरी, पिठलं, खरडा अशा उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. हिवाळ्यात सर्वत्र शेतीच्या बांधावर हुरडा पार्टी केली जाते. येथील गावकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारले असून यात कठपुतली नृत्यापासून ते उंट सफारीचा आस्वाद घेऊ शकता. विविध स्पोर्ट एडवेंचर सह बैलबंडी सवारीचा आनंद या गावात लुटू शकता.
ये दिल मांगे मोर :-
साधारण या परिसरात ३ हजारच्या वर मोर येथे वास्तव्य करतात. मोराचे थवे पाहण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ योग्य आहे. पावसाळा व हिवाळा हा मोरांचा आवडता काळ आहे. सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 7 ही मोर पाह्ण्यासाठीची उत्तम वेळ आहे. मोरांसह इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते .