शीतल सुवासिक – वाळा (vetiver)

शीतल सुवासिक – वाळा (vetiver)
उन्हाळा लागला की आठवण येते ती खसची. पूर्वीच्या काळात गाड्यांवर जी ताटी बघायला मिळायची ती याचीच. खसला मराठीत वाळा, संस्कृतमध्ये उशीर या नावाने देखील ओळखल्या जाते. शाकुंतल नाटिकेमध्ये ‘लावली थंड उटी वाळ्याची’ असे वर्णन करत वाळा वनस्पतीवर गीत गायिले आहे. वाळा हि बहुवार्षिक तृणवर्गीय वनस्पती असून 5 फूट पर्यंत उंच वाढू शकते. ह्यांची तंतुमय मूळ जवळपास 2 फुटापर्यंत जमिनीच्या आत जातात. तृणवर्गीय वर्गातील ही वनस्पती अतिशय सुगंधी स्वरूपाची आहे. अक्षय तृतीया सारख्या साडेतीन मुहूर्ताच्या सणाला ह्या वनस्पतीला मोठा मान आहे.
व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे. या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाळ्याच्या मुळांचा वापर चटया, पंखे, टोप्या बनविण्यासाठी करतात. जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताच्या बांधावर, उताराला वाळा (खस) गवताची लागवड केली जाते. शिवाय हि वनस्पती कीटक प्रतिरोधक, आग प्रतिरोधक व तण प्रतिबंधित करणारी असल्याने वाळा या बहुउपयोगी वनस्पतीची लागवड शेतक-यांसाठी फायदेशीर आहे.
औषधी उपयोग :-
वाळ्यामध्ये शीत हा मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड उत्तेजक व मूत्रल आहे. वाळा पित व कफनाशक तसेच दुग्धीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. तसेच वाळ्याचे तेल अत्तरे, सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. कुलरमध्ये सर्वार्धिक खस या सुवासिक गंधाचा वापर केल्या जातो. बाजारात वाळ्याचे उशीरासव, पंडगोदक, उशीरादि चूर्ण मिळतात.