बांधकामात आजही वापरतात चुना

पुरातत्व विभाग बांधकामात आजही वापरतात चुना
मागील आठवड्यात प्राचीन काळातील महिमापूर येथील विहिरीस भेट देण्याचा योग आला. पुरातत्व विभाग मार्फत विहिरीचे डागडुजी सुरु होते पण तिथे सिमेंट नावाला सुद्धा बघायला मिळाले नाही. जुनं ते सोनं का म्हणतात त्याचा अनुभव मला या डागडुजीच्या कामाच्या वेळी आली. विहिरीच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत दोन ते तीन टाके बनविले होते ज्यात चुन्याला मुरुविल्या जात होते. दुसरीकडे टाक्याच्या बाजूला 200 लिटर ड्रम मध्ये सडवा बनविला जातो ज्यामध्ये बेल, जवस, गुळ, तुरटी, केळाचे सिलटे, मिरी, आदींचा वापर केला होता. हा सडवा सोबत विटांची बारीक पूड (सुरकी) व वाळूची बारीक पूड नंतर चुन्यासोबत रोलर मशीनमध्ये एकजीव करून बांधकाम साठी वापरला जातो. चुना दगडी बांधकामात वापरल्यास दगडी बांधकाम दीर्घ काळ टिकण्यास मदत होते. यात कुठलेही कृत्रिम रसायन नसल्याने दगडाच्या बांधकामाची झिज होत नाही. बांधकाम दरम्यान चुना वापरल्याने दुषित हवा शुद्ध करण्याचे काम करतो. दगडावरील कळीकाम आणि भिंतीवरील गिलावा करण्यासाठी तसेच भिंतीतील दगड, विटा यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी चुना हा उपयुक्त पदार्थ आहे.
जुने ते सोनं :-
पूर्वीच्या काळी बांधकामात चुनखडी व शंखशिंपल्यापासून केलेला चुना असा दोन प्रकारचा चुना वापरला जात होता. चुनखडीचे दगड खाणीतून काढून भट्टीत भाजल्या जायचे. चुनखडी असलेल्या भागात दगडाची गोलाकार नाली बनवून बैलांच्या सहाय्याने मेडचे चाक फिरविली जायची.(उसाच्या रसवंती प्रमाणे) त्यामध्ये त्या परिसरातील भोकराच्या बिया, बिबे, कापूस, उडदाचे पीठ, भेंडी, डिंक, हिरडा, मेन, गुळ, जवस, कदंबाचा डिंक, त्रिफळाचे पाणी, हरबरा, किंवा गव्हाचे पीठ, केळी मिश्रण बांधकामासाठी व सांधे भरण्यासाठी वापरले जाई. हे बांधकाम करतांना मजुरांच्या हातापायाला भेगा पडू नये म्हणून तेल सुद्धा लावले जाते असल्याचे पुरातत्व विभागाचे बांधकाम व्यावसायिक हिरालाल कोहळे यांनी सांगितले.