
चक्क 30 सेकंदात मिळाले 10 लाख
प्रफुल्ल देशमुख यांचे तर्फे जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक ८ इंटर ॲक्टीव्ह पॅनल भेट
आमदारसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दातृत्वाची स्तुती
मांजरखेड कसबा
तो तसा अमरावती जिल्हा परिषदेचा विद्यार्थी…नंतर गावं सोडून नागपूरला उच्च शिक्षण घेतलं…हळूहळू तिथेच स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचे धडे गिरवत बांधकाम क्षेत्रात नावं कमावलं…प्रफुल्ल नरेंद्र देशमुख आज पी.डी.इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा नागपूर शहरातील नव्हे तर विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचे ते युवा आयकॉन बनले आहे.

गावच्या मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापकांनी प्रफुल्ल देशमुख यांचेकडे सहकार्य मागितले असता त्यांनी केवळ 30 सेकंदात 10 लाख रुपये किमतीचे आठ इंटर ॲक्टीव्ह पॅनल भेट दिले. प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर त्यांनी आपल्या गरीब मुलांच्या अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणून अनोखे पाऊल उचलले आहे. आज एखाद्या शाळेला समाज सहभागातून फार फार तर दोन तीन लाख गोळा होतात मात्र एका जिल्हा परिषद शाळेला बाजूला कुठलीही पंचतारांकित औद्योगिक वसाहत नसताना एकाच व्यक्तीकडून तब्बल 10 लाखापेक्षा अधिक वर्गणी मिळणे ही कौतुकाची ठरत आहे. या बाबीचे खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी भरभरून कौतुक केले आहे.

दिनांक 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरखेड कसबा येथे आठ इंटरॲक्टीव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रताप अडसड व मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांचे हस्ते आठ वर्ग खोलीत इंटरॲक्टीव्ह पॅनलचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री पाताळेश्र्वर व गुप्तेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्रपंत देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला गटविकास अधिकारी तेजश्री आवळे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, पंचायत समिती माजी सभापती प्रशांत भेंडे, विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण, सरपंच पल्लवी देशमुख, माजी सरपंच शैलेश देशमुख, अमोल देशमुख, दिलीप गुल्हाने, संजय सव्वालाखे, अशोक देशमुख शाळा व्यवस्थापन समितीचे विनोद भोगे, लक्ष्मी नेमाडे, हाफिज काजी, मोहंमद तन्वीर, विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे, नामदेव मार्डीकर ,अमोल चौकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुलाच्या कार्याचा अभिमान – नरेंद्र देशमुख
गावातील मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला प्रफुल्लने केलेले सहकार्य ही निश्चितच गौरवाची बाब आहे, पण यासोबत समाजातील कुठल्याही व्यक्तीच्या सहकार्यासाठी तो सदैव पुढाकार घेतो याचा मला वडील म्हणून कायम अभिमान असल्याचे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी काढले.

कल्पना शक्तीचा विस्तार – आ. प्रताप अडसड
इंटरॲक्टीव्ह पॅनलद्वारे मुलांच्या कल्पना शक्तीला वाव मिळणार असल्याने त्यांच्या कौशल्यांचा विस्तार होणार आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानचा वापर करून विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन उद्घाटक आ. प्रताप अडसड यांनी केले.

बदली संदर्भात शासन दरबारी पत्रव्यवहार
काही शिक्षक चांगल्या शाळा बनविण्यासाठी प्रयत्न करतात मात्र मध्येच त्यांची बदली होते, मेळघाटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग दिला आहे. त्यामुळे सरसकट सपाट भागातील शिक्षकांच्या सरसकट बदल्याऐवजी पेसा अंतर्गत शिक्षक भरतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. यामुळे सपाट शाळेवरील शाळा ओस न पडता चांगल्या शिक्षकांचे मनोधैर्य वाढीस लागेल असे बोलत शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव केला.
दानशूरांची भूमिका महत्वाची – संजिता महापात्र
जिल्हा परिषदेतील अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात. त्यांचं शिक्षण सुलभ होण्यासाठी समाजातील अनेक दानशुर व्यक्तींची भूमिका मोलाची आहे. प्रफुल्ल देशमुख यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत उंडे यांनी केले तर आभार संदीप बोडखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रशांत उंडे, मिर्जा गफ्फार बेग, अनिल भरोसे, माधुरी बुटे, संगीता आंबटकर, माधुरी थोरात, राम महाजन, मोहम्मद इरशाद, इम्राना मॅडम, प्रगती देशमुख, मोहसीना काजी, श्रीकृष्ण शिरभाते आदींनी सहकार्य केले.
कोरोना काळात जगविले 2 हजार कुटुंब
कोरोना काळात अनेकांनी आपल्या अधिनस्त काम करणाऱ्या लोकांना रोजगार पासून वंचित ठेवले होते. अगदी त्या वेळेस स्वतःच्या बांधकाम व्यवसायात सहकार्य करणाऱ्या शेकडो मजुरांना विना काम आर्थिक व किराणा साहित्य स्वरूपात सहकार्य केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी विशेष पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा दिला होता. मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संदेशनुसार तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी विलगीकरण कक्ष उभारून दिला.
