पाणी साठवणारे मगरीचे झाड – ऐन (Terminalia tomentosa)
पाणी साठवणारे मगरीचे झाड – ऐन (Terminalia tomentosa)
तुम्ही ताडोबा, मेळघाट किंवा पश्चिम घाटात भटकंती करत असाल तर मगरीच्या त्वचासारखे खरबडीत साल असलेले वृक्ष नजरेत पडते. साल मगरीच्या त्वचेप्रमाणे दिसत असल्याने या वृक्षाला ‘क्रोकोडाईल बार्क ट्री’ म्हणून ओळखतात. या झाडाला ऐन, साझ, आसना, आईन अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हे झाड साधारणता 100 फुटा पर्यंत वाढते. सुमारे 70 फुट एका सरळ रेषेत हे झाड वाढू शकते. याची गोलाई सुमारे 1 मी. इतकी रुंद असू शकते. याचे लाकूड हे अग्नीरोधीत व खडबडीत असते. यास कोणतीही चव अथवा वास असत नाही. याचा गाभा हा कथ्थ्या अथवा काळसर कथ्थ्या रंगाचा असतो. याला वाळवी लागल्यास त्याची भूकटी होते.
कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजे गौरी-गणपती. या गौरी-गणपतीच्या पत्रावळी व ओवाळणीमध्ये ऐन फळाचा आवर्जून समावेश दिसतो. या दरम्यान त्याला मोठा मान असतो. उन्हाळ्यात ऐन वृक्षाची पानगळ होते. पिवळसर पांढरी फुले आंब्याच्या मोहराप्रमाणे टोकावर झुपक्याने येतात. ऐनाच्या फळास पाच पंख असतात व ते सुमारे 3 सेंमी. असते. ते साधारणतः अंडाकृती असते. फळ सुरुवातीला पोपटी हिरवे असते. चैत्र, वैशाखाच्या सुमारास फळं झाडावर सुकून तपकिरी होतात. ऐनाच्या फांद्यांपासून लाख, पिंगट रंगाचा डिंक मिळतो. त्याचा उपयोग धुपासारखा होतो. ‘टसर’ जातीच्या रेशमाचे किडे पोसण्यासाठी ऐन आणि अर्जुन या दोन्ही वृक्षांच्या पानांचा उपयोग होतो. ऐनापासून मिळणारे लाकूड कठीण, मजबूत तसेच टिकाऊ असते. शेतीची अवजारे, घर बांधणी, तसेच जळण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. होडी किंवा रेल्वेच्या स्लीपर साठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर होतो.
चक्क खोडात पाणी :-
या प्रजातीतील काही सदस्य कोरड्या हंगामात पाणी साठवतात. हे झाड त्याच्या खोडाच्या अनुपातात एका विशिष्ट प्रमाणात पाणी साठवतात. त्याची वारंवारता व पाणी साठविण्याचे प्रमाण एका विशिष्ट परिस्थीतीत वाढते. आदिवासी बांधवाना हे वैशिष्टे माहिती असल्याने ते या वृक्षाला खच पाडून पाणी पितात. भगवान गौतम बुद्धांच्या पंक्तीतील विसावे बुद्ध असलेले तिस्सा बुद्ध यांना याच ऐन वृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्ती झाले असल्याचे जाणकार सांगतात.