
अमरावतीत साकारणार पायलटची ‘शाळा ‘
स्व. रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट : ग्रामीण भागातील युवक होणार ‘पायलट‘
अमरावती :-
नागपूर शहराच्या कायापालट नंतर मराठी नव वर्षात अमरावती शहराचे भविष्य उज्वल होत आहे. याचे कारण म्हणजे उद्या दिनांक 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावतीतील पहिले प्रवासी विमान ‘टेक ऑफ ‘ करणार आहे. विशेष म्हणजे याच मुहूर्तावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दक्षिण आशियातील सगळ्यात मोठ्या एअर इंडिया फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन Air India FTO अमरावती विमानतळावर शुभारंभ होत आहे.
स्व. रतन टाटा यांचा एका ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील प्रतिभावंत युवकांना पायलट होता यावे म्हणून त्यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. हा टाटा समूहाचा अमरावतीत पहिला प्रकल्प असून एअर इंडियाच्या माध्यमातून ही सुरुवात होणार आहे.
बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 0:30 वाजता अमरावती – मुंबई उड्डाण शुभारंभ सोबत फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे 34 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतील या क्षमतेच्या एअर इंडियाच्या विमानाचे सुद्धा उड्डाण होणार आहे.
दरवर्षी या एअर इंडिया FTO मधून 180 प्रशिक्षित पायलट प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या एअरलाइन्स मध्ये आपल्या सेवा देणार आहेत. आता विदर्भ सारख्या भागातील तरुण-तरुणींना या फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पायलट बनण्याची संधी मिळणार आहे.असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे कळविले आहे.
अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती
उद्या सकाळी साडे दहा वाजता अमरावती बेलोरा विमानतळहून पहिले पहिले प्रवासी विमान उडणार आहे. गत पस्तीस ते चाळीस वर्षांपासूनची मागणी तसेच विविध सत्तेत व विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांच्या परिश्रममुळे अमरावती करांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. सध्या हे विमानतळ सुरू करण्याचे श्रेय अनेक आजी माजी नेते घेत असले तरी सर्व सामान्य अमरावतीकर या वादात न पडता अमरावतीत एक सुंदर उपक्रमाचा शुभारंभ होत आहे याचा आनंद साजरा करण्यात मग्न आहे.
या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री. किंजारापू राम मोहन नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक खासदार व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.