पेंचसफारी – तीन ऋतूंचा निसर्गानुभव

पेंचसफारी – तीन ऋतूंचा निसर्गानुभव
पेंच…सातपुड्याच्या पर्वत रांगेत मध्य प्रदेश व महाराष्ट्रच्या संयुक्त भूमीत सुमारे ७६२ किमी चौरस क्षेत्रात विस्तारलेला व्याघ्र प्रकल्प. पेंक (भगवान) मढी(निवास) पासून पचमढी शब्द निर्माण झाला. मध्यप्रदेश पचमढीच्या पर्वत रांगेतून उगम पावणाऱ्या पेंच नदीच्या आजूबाजूला पेंच म्हणजे इंदिरा प्रियदर्शनी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली. नुकताच निसर्ग अभ्यासाच्या निमित्याने पेंचला जाण्याचा योग आला.
हा निसर्गानुभव अविस्मरणीय ठरला तो तीन नैसर्गिक ऋतूंच्या एकत्रित अनुभवामुळे. पावसाळ्यात जंगल भ्रमंती हि सर्व सामान्यसाठी बंद असते. दिनांक १२ एप्रिल रोजी पेंच मध्ये पाऊल ठेवले. घरून निघतांना उन्हाळा होता, पेंच मध्ये पोहचताना पावसाळा अनुभवला शिवाय रात्री व भल्या पहाटे हिवाळा असा दुर्लभ योग आयुष्यात तेही निसर्ग भ्रमंती करतांना पहिल्यांदाच अनुभवला.
निसर्ग अभ्यासक मंदार पिंगळे यांच्या सहवासाने पायदळ निसर्ग भ्रमंती व सफारी असा वेगवेगळ्या अंगाने पेंच अनुभवाला मिळाले. सकाळी पाच वाजता सिल्लारी गेट मधून निसर्ग सफारीला निघालो, खर तर मिणमिणत्या अंधारात पावसाची बारीक सर सुरूच होती. गाडीत बसल्यावर पाऊस भिजवणार तर नाही हि भीती, पण अंगावर पडणारे पावसाचे थेंब ते पण हवेसे वाटत होते. एक वेगळाच सुखद अनुभव दरम्यान जंगलातील प्राणी,पक्षी, सरपटणारे जीव, विविधांगी वनस्पती, लता वेली बघतांना मिळत होता. सफारी दरम्यान त्रिशूल, कॉलरवाली, लंगडी, एल मार्क,चार्जर, बडी माता, सुला, रायाकसा, टायझर, दुर्गा अश्या नानंविध वाघ-वाघिणीचे किस्से ऐकायला मिळत होते. हळूच सागाच्या निष्पर्ण झाडावर कालच्या वादळात नष्ट झालेले जटायूचे (गिधाड) जोडपे पुन्हा नव्याने घरटे उभारत होते. काही ठिकाणी तर माहूर वेलचे ( याच्या पानापासून पत्रावळी करतात) साम्राज्र दिसत होते. तर काही भागात गराडी वनस्पतीचा स्वतंत्र इलाका जाणवत होता. हळूच कधी नीलगाय, बारासिंगा व चितळाचा कळप तर जंगली वराह लक्ष वेधत होता. पाऊस पडल्याने मोर सुद्धा आपला पिसारा फुलवून लांडोर समोर नृत्य सादर करत होता. अनेक ठिकाणी लांब पिसारा फुलवून मोर जणू आम्हाला ‘तू खींच मेरी फोटो’ साठी पोझ देवून तयार होते. या सफारी दरम्याण केवळ वाघ बघण्यासाठी न आलेले मित्रपरिवार सरीसृप जीवापासून ते ईतर वन्यजीवांच्या दर्शनाने धन्यता मानत होते.
हत्तीचे दुर्लभ दर्शन :
सामान्यता पेंच मध्ये अधिवास नसलेला भीम नामक हत्ती अचानक आम्हाला सुखाऊन गेला. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) प्रमाणे भीम पेंचमध्ये दाखल झाला होता. खडी चढाई पार करून त्याने दिलेले अफलातून दर्शनाने आमचे पूर्ण पैसे वसूल करत जणू त्याने बोनस त्याने दिला होता. ब्रेकदरम्यान कोणी गाईड बिबट दिसल्याचे सांगत होते पण इथे ताडोबातील गाईड व चालक प्रमाणे घिसडघाई करणारे कोणी नव्हते. आमची गाडी तोतलाडोहकडे वळताना जारूळ, अमलतास , चारोळी, महूआ, आवळा, आफ्रिकन पळस, कढई (भुत्या), साग, सालई, हिरडा, अर्जुन, ऐन, भेरा, बांबू आदी विविधांगी वनस्पती बघायला मिळाल्या. या वृक्षराजीवर वारंवार घिरट्या मारणारा लांब शेपटीवाला कोतवाल, तर कधी गांधारी (खाटिक) आम्हाला बघून न बघितल्यासारखी करायची. पोपट तर आपल्या विश्वात मस्त होते, मधुघार, शिक्रा, लाल रानकोंबडा,पिंगळा, हरियाल, सुतार, आम्हाला अधूनमधून दर्शन देत होते. राखाडी धनेश (हॉर्नबिल) तर या भ्रमंती दरम्यान आमच्या सरबराईसाठी प्रत्येक ठिकाणी भेटायचा. तोतलाडोह चे निसर्ग सौंदर्य काश्मीर मधील तलावाच्या सौंदर्याची आठवण ताजी करत होते. तोतलाडोह ला तर मत्सगरुड दाम्पत्य भावी पिढीविषयक वार्तालाप करत होते. आमच्या स्वागतासाठी आमच्या गाडी भोवताल डोहाच्या काठावर नदी सुरय (रिव्हर टर्न) समूह नृत्यसह गायन करत होते. याच दरम्यान या काठावर जॅकल आपल्या पत्नी आदेशानुसार स्थितप्रज्ञ होऊन पिल्लांकडे म्हणजे घराकडे खडा पहारा देत हळूच डुलक्या घेत होता. हा निसर्गनुभव न संपणारा आहे. पुढल्या भागात उच्च शिक्षित निसर्ग सेवकसह पायदळ भटकंती व येथील वाघाची कथा बघणार आहोत.