संरक्षित जलस्थळ – रामसर स्थळ

संरक्षित जलस्थळ – रामसर स्थळ
रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय रामसर करार अंतर्गत नियुक्त केलेली एक पाणथळ जागा आहे . ज्याला “द कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स” असेही म्हणतात. ज्यामध्ये पाणथळ जमिनींचे संरक्षण आणि शाश्वत उपयोग, पाणथळ क्षेत्रांची मूलभूत पर्यावरणीय कार्ये आणि त्यांचे आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि मनोरंजन मूल्य ओळखले जाते.
दिनांक 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर (इराण) येथे युनेस्कोच्या अधिपत्याखाली हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार करण्यात आला. म्हणून २ फेब्रुवारी रोजी सर्वत्र जागतिक पाणथळ दिन सर्वत्र साजरा केला जातो.
रामसर परिषदेत ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी नऊ वेगवेगळे निकष ठरवण्यात आलेत. पहिला निकष म्हणजे नैसर्गिक वा अर्ध-नैसर्गिक, पण दुर्मीळ पाणथळ ठिकाण, दुसऱ्या निकषात त्याठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीव प्रजाती संवर्धनसाठी असलेले महत्त्व, तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभौगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व, चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळाचे महत्त्व, पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी असून यात 20 हजार पाणपक्ष्यांचा आढळ किंवा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांच्या आढळ, सातवा आणि आठवा निकष स्थानिक मत्स्यप्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व आणि नववा निकष म्हणजे पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का आढळ असणे आवश्यक आहे.
जगात एकूण 2400 रामसर स्थळ आहे. ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग द्वीपकल्प हे(1974) जगातील पहिले रामसर स्थळ आहे. युनायटेड किंगडम येथे जगातील सर्वाधिक रामसर स्थळ आहेत. भारतात एकूण ७५ रामसर स्थळे असून उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक (8) रामसर स्थळ आहेत. पश्चिम बंगालमधील सुंदरबन (4220 चौ. किमी) हे सर्वात मोठे रामसर स्थळ आहे तर हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलँड (0.2 चौ. किमी) हे भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात तीन रामसर स्थळे आहे. यात नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे पहिले , लोणार (बुलढाणा) हे दुसरे तर ठाणे खाडी हि तिसरे रामसर स्थळ आहेत.