तंत्रज्ञान विशेष

अमरावतीत भरणार बालवैज्ञानिकांचा मेळा

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा पुढाकार

अमरावतीत भरणार बालवैज्ञानिकांचा मेळा

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा पुढाकार

साडेतीनशे बालवैज्ञानिक करणार कौशल्यांचे सादरीकरण

अमरावती

५२ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन दिनांक २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन २९ जानेवारी २०२५ रोजी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख हे राहणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला खा. डॉ. अनिल बोंडे, खा. बळवंत वानखडे, खा. अमर काळे, आ. किरण सरनाईक, आ. धीरज लिंगाडे, आ. रवी राणा, आ.सुलभाताई खोडके, आ. प्रताप अडसड, आ. केशवराव काळे, मा. प्रविण तायडे, आ.राजेश वानखडे, आ.उमेश यावलकर, आ.गजानन लवटे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञान नगरी उभारण्यात आली आहे.

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आणि विज्ञान व गणित विषयात नव्या कल्पनांची रुजवात करणे. या प्रदर्शनीचा मुख्य विषय “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” असून, पर्यावरणीय आणि सामाजिक गरजांच्या अनुषंगाने सात उपविषयांवर आधारित प्रकल्प सादर केले जातील. यामध्ये अन्न, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग व संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, आणि संसाधन व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या विषयांवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती आणि नवकल्पनांचे प्रदर्शन होणार आहे, ज्यामुळे त्यांची कल्पकता आणि शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होईल.

प्रदर्शनामध्ये राज्यातील ३७ जिल्ह्यांमधील ३३० विद्यार्थी आणि १११ शिक्षक सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांसोबतच शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यकांनी सादर केलेल्या उपकरणांमुळे प्रदर्शन अधिक आकर्षक ठरणार आहे. अमरावतीतील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, यासाठी दररोज १,००० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि प्रेरणेसाठी “सायन्स टॉक्स” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील नामांकित वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रख्यात वैज्ञानिक डॉ शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त टाटा इंष्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील प्राध्यापक डॉ विवेक पोलशेट्टीवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे माजी सहायक अधिष्ठाता तसेच विज्ञान भारतीचे विदर्भ प्रांत सचिव डॉ. प्रकाश इटनकर तसेच डॉ अविनाश मोहरील, प्राचार्य महिला महाविद्यालय, अमरावती तथा संत गाडगे बाब अमरावती विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे माजी अधिष्ठाता या तज्ञांची व्याख्याने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरेल.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालक हर्षलता बुराडे, प्रदर्शन समन्वयक प्रा. प्रवीण राठोड व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. जि. व्ही. कोरपे,प्रा. डॉ. पंकज नागपुरे, डॉ. संगीता इंगोले आदी आयोजकांच्या वतीने  सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close