
नऊ रंगाचा धनी – नवरंग (Indian Pitta)
पावसाच्या दिवसात आकाशात आपण सात रंगाचे इंद्रधनुष्य बघितले आहे, याच कालावधीत एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रंगाचा धनी असलेला नवरंग पक्षी आपणास बघायला मिळतो. यालाच हिंदीत भाषिक प्रदेशात पिट्टा, चरचरी, नवरंग, नोरंग, रुगेल, तर मराठीत बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल या नावाने देखील ओळखल्या जाते. या पक्ष्याचा वावर कश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत आहे. हा पक्षी मुळचा श्रीलंका व दक्षिण आशियायी प्रदेशातील आहे. नवरंग हा झुडपी व भारतातील ईतर वनांत आढळतो. पक्षातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. डोके फिकट पिवळसर रंगाचे, चोचीपासून माने पर्यंत काळा गडद रंग, पंख हिरवे व त्यावर आकाशी ठिपका असतो. गळयाखाली पांढरा तर शेपटी खाली व पोटाखाली जर्द लाल रंग असतो. उडतांना निळसर व तांबड्या छटा व पांढरे ठिपके दिसतात. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. ह्याच्या शरीरावर नऊ विविध रंगाच्या छटा दिसत असल्याने ह्याला नवरंग असे नाव पडले आहे. त्याच्या शरीरातील निळा रंग हा सायनाईन घटकामुळे दिसून येतो. वनस्पतीच्या उतींमध्ये सायनाईन प्रचलित असते. तेलगू भाषेत पिट्टा म्हणजे छोटा पक्षी.
नवरंग हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून आखूड शेपटीचा आहे. हा साधारण 18 ते 20 सेमी लांबीचा असतो. मे ते ऑगस्ट या दरम्यान याचा विणीचा हंगाम असतो. हा देशांतर्गत स्थलांतर करणारा पक्षी आहे. विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे. व्हीट – ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या पानांवरील व जमिनीवरील लहान कीटक, अळ्या, मुंग्या, बीटल, कोळी, गांडुळे, लहान नाकतोडे हे नवरंगाचे आवडते खाद्य आहे.
भर वादळात घरट्याची निर्मिती :-
या पक्ष्याचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असल्याने वादळात देखील आपले घरटे बनवतो. अवघा 5 ते 6 दिवसात तो आपले घरटे पूर्ण करतो. हा पक्षी गवत व कमी उंचीच्या म्हणजे 5 ते 15 फूट उंच झाडांवर व तसेच क्वचितच जमिनीवर झुडपांच्या आडोशाने फुटबॉल सारखे गोलाकार आकाराचे सुरेख घरटे बनवुन त्यात अंडी घालतो. दरदिवशी एक याप्रमाणे 4 ते 6 गुलाबी रंगाची अंडी हा पक्षी देतो. पिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी नर व मादी दोघेही सांभाळतात. 12 ते 16 दिवसांत पिल्लांची वाढ होऊन ते उडण्यासाठी सज्ज होतात. विणीच्या हंगामानंतर हे पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतर करतात. हा पक्षी रात्री झाडावर व दिवसा जमिनीवर पालापाचोळा उलथापालथ करतांना आढळून येतो.
सहाचा अलार्म :-
सकाळी व सायंकाळी सहा दरम्यान हा पक्षी शिळ घालत असल्याने ह्या पक्ष्याला ‘सिक्स ओ क्लॉक बर्ड’ म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. ढगाळ वातावरण असल्यास तो दिवसभर ओरडतो. ह्याच्या पंखांवरील सुंदर रंगांमुळे ह्याला ज्वेल थ्रश म्हणून देखील ओळखतात.
शेतकऱ्यांचा सोबती :-
नवरंग हा पक्षी आपल्या महाराष्ट्रात साधारणतः मे ते जून महिन्यात आढलतो. मे महिन्यात आगमन झाल्यानंतर साधारणतः दीड महिन्यात पाऊस पडतो. पावसाच्या आगमनाची चाहूल तो विशिष्ट प्रकारच्या आवाजाने देतो त्यामुळे ह्याला शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखल्या जाते. मे च्या सुरुवातीला कोकणात तर दुसऱ्या तिसऱ्या सप्ताहात विदर्भात आढळतो.