बहुगुणी गवती चहा Cymbopogon citratus;
बहुगुणी गवती चहा Cymbopogon citratus;
गवती चहा ही मुळात आफ्रिका ,युरोप, आशिया व आस्ट्रेलिया या या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
गवती चहाला सुगंध, अग्याघास, गंधबेना, हरिचांय ,गंधतृण , लेमनग्रास अशा विविध नावांनी संबोधिले जाते. याची पाने व तेल औषधांत वापरतात. एक काळ आपल्याकडे सिंगापूर व श्रीलंकेतून गवती चहा तेल आयात होत असे. आता उत्तम दर्जाचे गवती चहा तेल केरळमधून येते. तेथील गवती चहाची पाने तुलनेने मऊ, आकर्षक, पिवळसर हिरवट रंगाची असतात. तेलाचे प्रमाण जास्त पडते. महाराष्ट्रात गवती चहा सर्वत्र सहजपणे उगवतो वा मुद्दामहून परसबागेत लावला जातो. गवती चहा हाताने चोळल्याबरोबर एक विशेष जम्बीर प्रकारचा सुगंध येतो म्हणून त्याला जम्बीर असे नाव पडले आहे. ओला चहा हे उत्तम औषध आहे. सर्दीत, पडशात किंवा प्राकृत ज्वरात याचा चहा व काढ्याचा वाफारा फार हितकारी होतो. पोट बिघडले असल्यास गवती चहा उकळवून दिलेल्या पाण्याने उलटी थांबते, पोटाचे व एकूण आरोग्य सुधारते. हट्टी तापात जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा. त्यामुळे पोट सुधारून वायू कमी होतो. गवती चहाच्या अर्कास ऑईल ऑफ व्हर्बेना किंवा ‘इंडियन मेलिसा ऑईल’ असेही संबोधतात. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. हे तेल सांधेदुखीवर उपयुक्त आहे. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो. पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात