प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देणारी ‘नयनतारा’

प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देणारी ‘नयनतारा’
गत आठवड्यात ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघीनाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान वायरल झाला. या व्हिडीओ मध्ये ताडोबा मधील निमढेला बफर क्षेत्रातील नयनतारा या वाघिणीच्या तोंडात पाण्याच्या बाटली अलगद उचलून नेण्याचा तो व्हिडिओ होता. काहींनी या वाघिणीच्या कृतीचे अभिनंदन केले तर काहींनी ताडोबा वनविभागाच्या प्रशासनावर प्लास्टिक आढळल्याने शब्दसुख घेतले. यापूर्वी ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पात आधी प्लॅस्टिकच्या बाटल्यांशी वाघ खेळताना आढळून आला होता.
छोटा मटकासूर व भानुसखिंडी या दाम्पत्याचे बछडे असलेली नयनतारा आता मोठी होत आहे. पर्यटकांनी तिच्या सुंदर डोळ्यामुळे तिचे नामकरण नयनतारा असे केले आहे. जांभूळडोह पाणवठ्यावर तृष्णातृप्ती साठी गेलेल्या नयनताराच्या नजरेत प्लास्टिक बॉटल पडली. हि वस्तू आपल्या घरातील नसल्याने चक्क ती तोंडात धरत पर्यटकांच्या जिप्सी समोर आणून टाकली. कदाचित मानवांनो तुम्ही तुमच्या परिसरात भरपूर प्रमाणात कचरा करता आता ह्या प्लास्टिकचा भस्मासुर आमच्या जंगलात आणू नका असा काहीसा संदेश तिला तिच्या कृतीतून तर द्यायचा नसेल ना ?
निसर्ग दर्पण च्या २७ व्या अंकात (२४ एप्रिल २०२४) ताडोबा परिसरात टिश्यू पेपर, प्लास्टिक सारख्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ताडोबा परिसरात असलेल्या रिसोर्टवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बॉटल व टिश्यू पेपरचा बापर हॉटेल व्यवसायिकांद्वारा पर्यटकासाठी केला जातो. हॉटेल द्वारा सफारी दरम्यान गाड्यांमध्ये नाश्ता व पेयजल पुरविल्या जाते.काही पर्यटक अगदी बेफिकीर होऊन वनविभागाने तयार केलेल्या नियमांची पायमल्ली करत टिश्यू पेपर व प्लास्टिक बॉटल गाडीतून बाहेर फेकल्याचे आढळून आले आहे. आता तर नयनताराच्या व्हिडिओच्या रूपाने मोठा पुरावा पुढे आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नयनताराने प्लास्टिक निर्मूलनाचा मोठा संदेश ह्या माध्यमातून दिला आहे.