जागलीचा साथीदार – मचांग

जागलीचा साथीदार – मचांग
सातपुड्याच्या पर्वत रांगेत भटकंती करताना अनेक शेतात काही लाकडांपासुन तयार केलेली उंच झोपडी दिसते. साधारण जमीन पासून सात ते नऊ फूट उंचावर सागवान लाकडापासून ही झोपडी बनविली जाते. या झोपडीला मेळघाटात मचांग असे म्हणतात. पक्षी निरीक्षण दरम्यान अनेक ठिकाणी वनविभागात आपण जे मचान बघता अगदी त्या प्रकारे याची रचना असते.
हिवाळ्यात पिकांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी बांधव लाकडी ठुण्या व बांबूच्या सह्यायाने शेताच्या मध्यभागी मचांगची उभारणी करतात. यात बांबूच्या कमच्याच्या ताट्याच्या वापर वरच्या भागात केला जातो. बांबूच्या मदतीने कमान तयार केली जाते. आदिवासी महिला या झोपडीच्या खाली सुंदर सारवण करतात. गहू, तुर, हरबरा, आदी अनेक पिकांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधव थंडीच्या दिवसात येथे वास्तव्य करतात. घरातील बालके व म्हातारी वगळता कर्ते महिला व पुरुष शेतात जागरण करतात. कधीकधी लहान बालके सुध्दा आपल्या आई वडीलासह यात वास्तव्य करतात. या रात्रीच्या जागरणाला स्थानिक भाषेत ‘जागली ‘ म्हणतात. जंगलातील वाघ, बिबट,अस्वल सारख्या वन्य जीवांपासून संरक्षण करण्यासाठी हे मचांग उभारतात. यामध्ये खाण्यापिण्याच्या व अंथरूण सारख्या गरजेच्या वस्तू राहतात.
इकोफ्रेंडली मचांग
मचांग पूर्णतः स्थानिक साहित्य पासून तयार केले जाते. अगदी बांबू बांधण्यासाठी विविध वेलीय वर्गीय वनस्पतीचा वापर केला जातो. हिवाळ्यात तापमान मेन्टेन करण्यासाठी तसेच वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी झोपडीखाली जमिनीवर शेकोटी पेटविल्या जाते. तसेच वरच्या भागात चटईवर मध्यभागी माती टाकून त्यावर विस्तवांचा आहार ठेवल्या जातो त्यामुळे झोपडीतील तापमान थोडे मेन्टेन राहते. गोधडी( वाकळ) व हल्ली ब्लँकेट चा वापर आदिवासी बांधव जागली दरम्यान करतात.