वारकऱ्यांची दर्शन बारीत ‘फुगडी’
दर्शनाला 12 तासांची प्रतीक्षा : दर्शन रांगेत सत्तर हजारपेक्षा अधिक भाविक

वारकऱ्यांची दर्शन बारीत ‘फुगडी’
दर्शनाला 12 तासांची प्रतीक्षा : दर्शन रांगेत सत्तर हजारपेक्षा अधिक भाविक
1 जुलै पासून महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्रप्रदेश प्रदेश तसेच देशातील विविध भागातून भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवासाने वारकऱ्यांचे त्राणलेले देह पंढरीत येताच दर्शनासाठी बारित लागतात. सध्या विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकऱ्याला दहा ते बारा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कधी कधी दर्शन रांगेत जॅम लागत असल्याने वारकरी आपला थकवा विसरून विठुरायाचा गजर करत बारीतील अत्यल्प जागेत फुगडी व नृत्याचा ठेका धरत विठूरायाच्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. विशेष म्हणजे फुगडीचा फेर धरण्यात मुलं, मुली, स्त्रिया आदीं सर्वांचा समावेश आहे. थकलेल्या शरीराला दर्शन वारीतील फुगडी व गाण्यावरील ठेक्याने वेगळाच उत्साह संचारला होता.
6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त राज्यातील काना-कोपऱ्यातून दिंडी पालख्या पंढरीत आगमन करत आहे. 1 जुलै पासून पंढरपूर येथे वारकऱ्यांचे येणे वाढलेले आहे. अनेक दिंडी व पालख्यांचे पंढरीत आगमन झाल्यावर चंद्रभागेच्या पात्रात पवित्र स्नान करतात. त्यानंतर गर्दिपूर्वी दर्शन होण्यावर प्रत्येकाचा भर असल्याने आल्या पाऊली दर्शन रांगेत लागतो. पंढरपूर शहरात चंद्रभागा नदी परिसर व ईतर भागात घाण होऊ नये यासाठी जागोजागी सुलभ शौचालय उभारली आहे.
दहा किमीचा दर्शन प्रवास :
वारकऱ्यांना सहज सुलभ विठूरायाचे दर्शन व्हावे यासाठी प्रशासनाने 12 दर्शन मंडप उभारली आहेत. आणखी काही मंडप उभारणी सुरू आहे. प्रत्येक मंडपमध्ये साधारण दोन ते अडीच हजार वारकरी उभे राहू शकतात अशी व्यवस्था आहे. साधारण एका वेळेस दर्शन रांगेत सत्तर ते बहात्तर हजार भाविक प्रतीक्षेत आहे. पुढील आणखी मंडप वाढविण्यासाठी मंदिर प्रशासन परिश्रम घेत आहे. विविध संस्था, स्वयंसेवक मार्फत चहा – नाश्ता, पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्यक्षात प्रारंभ ते मूर्ती दर्शन हे तीन किमी अंतर असले तरी दर्शन रांगेतील विविध कप्प्यातील फेऱ्यांमुळे साधारण दहा किमी पेक्षाही अधिक प्रवास वारकऱ्यांना करावा लागत आहे.
वारकऱ्यांच्या हाती शिक्का :
दर्शन रांगेतून अल्प कालावधीसाठी बाहेर पडण्यासाठी भाविकांच्या हातावर शेड क्रमांकसह शिक्का मारल्या जात आहे. काही ठिकाणी पेनाने सांकेतिक चिन्ह उमटविली जात आहे. दर्शन रांगेतील सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या सोबत यंग ब्रिगेडची रेस्क्यू फोर्स तैनात आहे. रेस्क्यु फोर्समुळे बोगस दर्शनाला आळा बसत आहे.
ज्येष्ठांचे व्हावे सुलभ दर्शन :
सध्या दर्शन रांगेतील तब्बल दहा ते बारा तासांचा कालावधी एकादशी पर्यंत वाढीवर राहणार आहे. सत्तरीवरील ज्येष्ठ व चिमुकल्या बालकांचे दर्शन सुलभ होण्याची मागणी भाविकांतर्फे होत आहे. वारीतील पायदळ प्रवास त्यानंतर सलग दहा तासांपेक्षा अधिक दर्शन रांगेतील चढ उताराचा अनुभव ज्येष्ठ व चिमुकल्यांचा थोडा टेन्शन वाढविणारा आहे.
आरोग्य सुविधा :
पंढरीत येणाऱ्या प्रत्येकाची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी आरोग्य विभागाने जागोजागी आरोग्य सुविधा उभारल्या आहेत. दर्शन मंडप पासून ते ठिकठिकाणी छोटे आरोग्य सुविधा केंद्र उभारली आहेत. आय सी यू पासून दहा रुग्णाच्या बेडची व्यवस्था या आरोग्य केंद्रात केली आहे. गावाच्या वेशीवर सुध्दा प्रत्येक रस्त्यावर ही आरोग्य केंद्र बघायला मिळतात