लाडकी बहिण नंतर यांचे भविष्य चकाकणार
महाराष्ट्रीयन युवकांना मिळणार जर्मनीत रोजगार

महाराष्ट्रीयन युवकांना मिळणार जर्मनीत रोजगार
जगातील बहुतांश युरोपियन देश हे औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहे, मात्र काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जर्मनीमधील बाडेन-वूटेनबर्ग या राज्यासोबत 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचा सामंजस्य करार झाला आहे. या करारा अंतर्गत महाराष्ट्र राज्य जर्मनीला आरोग्य, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण, परिवहन व कामगार क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाद्वारे सुरुवातीला सुमारे दहा हजार युवकांना चांगल्या वेतनाची नोकरी प्राप्त होणार आहे.
यांना मिळणार रोजगार :-
जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळांची आवश्यकता असल्याने वैद्यकीय शिक्षण अंतर्गत परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींचा काळची वाहक, दस्तऐवज व कोडिंग त्रयस्थ प्रशासक, वैद्यकीय लेखा व प्रशासन अशा पदांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत सेवक, वेटर, स्वागत कक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखाधिकारी, सफाई कामगार, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहाय्यक तंत्रशिक्षण विभागांतर्गत इलेक्ट्रिशियन, पेंटर, औष्णिक वीजतंत्री, सुतार, गवंडीकामगार, प्लंबर, मोटर मेकॅनिक, या पदांना संधी राहणार आहे. यासोबतच हलके व जड वाहन चालवणारे वाहनचालक तसेच सुरक्षा रक्षक,डिलिव्हरी बॉय यांना रोजगार प्राप्त होणार आहे.
बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेला दिली आहे. याकरिता राज्यस्तरावर संनियंत्रण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये परिवहन आयुक्त, वैद्यकीय आयुक्त, शिक्षण आयुक्त ,कौशल्य विकास आयुक्त, कामगार आयुक्त, तंत्र शिक्षण शिक्षण संचालक आदी सदस्य तर सचिव म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक राहणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापनेला गती आली असून यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य हे मुख्य समन्वयक असून सदस्य म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक आयुक्त कौशल विकास, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक संस्था, सहाय्यक कामगार आयुक्त, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आदींचा सहभाग राहणार आहे.
कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जर्मन भाषा व शिष्टाचारनुसार कौशल्यवृद्धी करिता चार महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून जर्मन भाषेची प्रशिक्षण देणारी गोठे इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्र राज्याला सहकार्य करणार आहे. यामध्ये जर्मन भाषेच्या प्रशिक्षणावर प्रतिव्यक्ती 33 हजार रुपये प्रमाणे 33 कोटी रुपये , सोबतच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी 3 कोटी आणि कौशल्यवृद्धीच्या अतिरिक्त प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील प्रतिव्यक्तीसाठी सात हजार रुपये तर शहरी भागातील प्रतिकृतीसाठी दहा हजार रुपये असे 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण 76 कोटी रुपये प्रस्तावित केले आहे.
जीवनमान उंचावणार :-
महाराष्ट्र राज्यात सध्या लाखो उच्च शिक्षित तरुण बेरोजगार आहे. राज्यात पुरेसा रोजगार नसल्याने ते बेरोजगाराच्या गर्तेत जीवन जगत आहे. महाराष्ट्र व जर्मनीमधील बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी करार झाल्याने या बेरोजगारांना जीवनमान उंचावण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
अशी होणार प्रक्रिया ? :-
सध्या या संदर्भात विविध उच्च पातळीवर चर्चा सुरू असून पदाची अर्हता, किमान वेतन, प्रशिक्षण पद्धत, व्हिसा या संदर्भात बैठका सुरू आहेत. सरकार स्वतः या बाबत पुढाकार घेणार की एखादी नोडल एजन्सी स्थापन करून त्यांचे कडे जबाबदारी देणार हे निश्चित होणार आहे. लवकरच याबाबतचे अपडेट्स इथेच तुम्हाला मिळणार. राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेप्रमाणे या उपक्रमाची जनमानसात चर्चा होणार हे निश्चित आहे.