आयआयटीयन्स देणार स्पर्धा परीक्षेचे धडे
साथी एआय प्लॅटफॉर्म :- शिक्षा मंत्रालय व आय आय टी कानपूरचा संयुक्त उपक्रम

आयआयटीयन्स देणार स्पर्धा परीक्षेचे धडे
साथी एआय प्लॅटफॉर्म :- शिक्षा मंत्रालय व आय आय टी कानपूरचा संयुक्त उपक्रम
दहावी, बारावी नंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश हे अनेक विद्यार्थी व पालकांचे स्वप्न असते. विद्यार्थी व पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकारचे शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी ‘साथी ‘ हा नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. आय आय टी कानपूर च्या सहकार्याने विकसित केलेल्या ‘साथी’ या एआय बेस्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, एक हजार पेक्षा अधिक व्हिडिओ, दहा हजार पेक्षा अधिक प्रश्नांचे उत्तरे, शंकांचे समाधान तसेच आयआयटी, एम्स सारख्या नामांकित संस्थांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घरबसल्या मोफत मिळणार आहे.
‘साथी’ (Self-Assessment, Test, and Help for Entrance Examination) या वेब पोर्टल उपक्रम अंतर्गत अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठी स्वयं मूल्यमापन चाचणी व परीक्षेसाठी मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. ‘साथी’ एआय मध्ये अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी 45 दिवसाचे सत्र राहणार आहे. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्रवर आधारित एक हजार पेक्षा अधिक व्हिडिओचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी हजारो प्रश्न, साप्ताहिक पाठानुसार मॉक टेस्ट, सर्व सामान्यांचे प्रश्नोत्तरे साठी ए आय चॉटबॉट, मोबाईल एप, परीक्षेच्या तयारीसाठी व पेपर सोडविण्यासाठी वेबिनार याशिवाय आय आय टी व एम्सच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. इथे विविध ऑनलाईन वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शंकेचे समाधान मार्गदर्शक द्वारा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत स्वरूपातील असून 13 विविध भाषेत मार्गदर्शन साहित्य उपलब्ध राहणार आहे.
इथे मिळणार मार्गदर्शन :-
विद्यार्थ्यांनी कुठल्याही सर्च इंजिनवर जावून सर्च बार मध्ये http://sathee.prutor.ai हे शब्द लिहायचे आहे. ज्यांचेकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप नसेल त्यांनी आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जावून SATHEE असे टाईप केल्यावर हे एप्स वर येईल. त्याला डीजीलॉकर किंवा गुगल अकाऊंट द्वारा सुरु करायचे. साथीच्या चॉकबॉटवर तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तर तुमच्या समस्या संदर्भात यावर त्वरित उत्तर मिळणार आहे.
यशाचे प्रवेशद्वार :-
ज्या पालकांना आपल्या पाल्यांना चांगले कोचिंग देण्यासाठी मोठ्या शहरात किंवा नावाजलेल्या संस्थेत प्रवेश करण्याची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थिती अभावी किंवा अन्य सामाजिक समस्या असल्याने आपल्या पाल्यांना पाठवू शकत नाही अश्यांना घरबसल्या भारतातील नामांकित शैक्षणिक तज्ञांद्वारा NEET, JEE, SSC, RRB सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. साथी प्लॅटफॉर्म हे विद्यार्थी व पालकांचे स्वप्नांची प्रतिपूर्ती करणारे प्रवेशद्वार ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षेचा खरा ‘साथी’दार

शिक्षा मंत्रालयाच्या या उपक्रमाचा फायदा अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेसह बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन आदी विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये आय आय टी व एम्सच्या विद्यार्थ्यांकडून नोट्स तयार करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेचा खरा ‘साथी’दार ठरणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी सांगितले.