
रामराज्यात जटायुंचे अच्छे दिन
पेंच व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गिधाडांचे संवर्धन
दिनांक 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम चंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला. आता सर्वत्र सोशल मिडीयावर अच्छे दिनची चर्चा सुरू असताना वनवास दरम्यान सीता अपहरणाचा पहिला साक्षीदार असलेला जटायू अर्थात गिधाडांना अच्छे दिन येणार असल्याची चर्चा वन्यप्रेमिंमध्ये होत आहे.
अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा मुहूर्तावर महाराष्ट्रातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पात 10 गिधाडांना सोडण्यात आले. गिधाड या पक्ष्यांचे पुनर्प्रस्थापन व्हावे म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या महत्वपूर्ण पुढाकाराने जटायु संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरयाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे 10 गिधाड पक्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरीलीज अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले आहे. यासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात 10 लाँग बिल्ड गिधाडांना आणण्यात आले आहे. साधारणत: 3 महिने रिलीज पिंजऱ्यात वेटरनरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे पक्षी ठेवले जाईल. यानंतर ह्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. 2006 मधील योजनेनुसार गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी हरियाणा, आसाम, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये संरक्षण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
का होत आहे गिधाडांचे संवर्धन :-
गिधाड पक्ष्याचे निसर्गातील अन्नसाखळीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गिधाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. मृत प्राण्यांना खाऊन तो आपली उपजीविका पार पाडतो. भारतात गिधाडांच्या 9 प्रजाती आढळतात. सन 1990 मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती पण, आता ती संख्या कमी होऊन केवळ 50 हजारांवर आली आहे. गिधाड प्रजाती नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन तसेच कत्तलखाण्यामुळे त्याची उपासमार होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. ताडोबा क्षेत्रातील गावे पुनर्वसित झाल्यामुळे येथे मनुष्यविरहीत जंगल आहे. त्यामुळे ताडोबा हे जटायुंचे चांगले अधिवास आहे. पेंच व ताडोबा व्याघ्र प्रकल्प गिधाडसाठी सुरक्षित वनक्षेत्र आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वनविभागाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या सहकार्याने पुढाकार घेऊन हे गिधाड संवर्धनाचे पाऊल उचलले आहे.