निसर्ग सेवकांना मिळाली ‘ दिव्य दृष्टी ‘
निसर्ग सेवकांना मिळाली ‘ दिव्य दृष्टी ‘
वनविभागात काम करतांना अनेक वन कर्मचारी व वन अधिकारी आयुष्यभर वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे काम करतात किंबहुना ह्याच कामाला ते वाहून घेतात. मेळघाटातील ह्याच कामादरम्यान सूक्ष्मजीव, प्राणी, कीटक , सरीसृप ते भल्या मोठ्या वृक्षांकडे सौंदर्य दृष्टिकोनातून बघून वन कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय कामात अभिरुची निर्माण करण्याचे कौशल्य साधले ते दिव्या भारती या उपवनसंरक्षक अधिकाऱ्याने. त्यांच्या ह्या अनोख्या मार्गदर्शनामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागमध्ये वनमजूर ते सहायक वनसंरक्षक अधिकाऱ्यांमध्ये वेगळी अभ्यासमय व कलात्मक ‘ दिव्यदृष्टी ‘ निर्माण झाली आहे.
वनविभागात वनमजूर, वनरक्षक हे प्रत्यक्ष काम करणारे घटक. जंगलामध्ये केवळ वाघ हा केंद्र बिंदू म्हणून न बघता सूक्ष्मजीव ,कीटक, फुलपाखरू, सरीसृप, पक्षी, प्राणी, लता, वनस्पती सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या आहे. ह्या प्रत्येकाचा जैव विविधता मध्ये महत्वाची भूमिका आहे. आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य दिव्या भारती यांनी केली आहे. ह्या कर्मचाऱ्यांनी सुध्दा अधिकाऱ्यांना तेवढीच मोलाची साथ देत मेळघाटमधील विविधांगी माहिती संकलन केले आहे. मेळघाट च्या सुवर्ण महोत्सव निमित्याने ‘ ट्रीज ऑफ मेळघाट ‘ या सुंदर ग्लॉसी माहिती पुस्तिकेचे निर्माण केले आहे. यामध्ये मेळघाटातील अती महत्वाच्या 50 महत्वाच्या औषधी वनस्पतीचे सुंदर छायाचित्रसह महत्वाची माहितीचे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यात अकोट वनविभागाचे उप वनसंरक्षक जयकुमारन या अधिकाऱ्याची महत्वाची साथ मिळाली आहे.
कार्यशाळांचे आयोजन :
कर्मचाऱ्यांमध्ये जैव विविधतामधील अन्न साखळी अंतर्गत प्रत्येक जीवाचा अभ्यास व्हावा म्हणून विविध ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कोळीतज्ज्ञ पासून ते वनस्पती तज्ज्ञ उपलब्ध करून देत वन कर्मचाऱ्यांमध्ये अभ्यासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. याची फलश्रृती म्हणजे अनेक कर्मचारी आता विविध विषयात अगोदर अभ्यासक व त्यातून मार्गदर्शक म्हणून तयार होत आहे. आय नॅचरलिस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय दस्तऐवज संकलन करणाऱ्या एप्स मध्ये मेळघाटातील सामान्य वन कर्मचारी ने शोधलेल्या स्पेसिसची नोंद होत आहे.
शाबासकी सोबत बक्षीस :-
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद रहावा म्हणून स्वतः भारती ह्या मराठी भाषा शिकल्या आहे. ज्या कर्मचाऱ्याने सुंदर कार्य केले आहे त्यांच्या कामाची दखल ते केवळ शाब्दिक स्वरूपात न करता त्यांना शाबासकीसह बक्षीस देण्याचे औदार्य त्या दाखवतात. आय नॅचरलिस्ट मध्ये आतापर्यंत मेळघाट मधून 1788 निरीक्षण नोंदविले आहे. यापैकी 759 ची नोंद घेण्यात आली असून मागील 2 वर्षात 759 वन्य जीवांची नोंद घेण्यात आली आहे. यात मोलाची सर्वाधिक वन्य जीवांची नोंद करणाऱ्या सूरज भगत, संतोष हेकडे, दिलीप जामुनकर या वनरक्षकांना बक्षीस म्हणून मोबाईल भेट दिले आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या गरजांना प्राधान्य :
वन विभागाचे संवर्धन व संरक्षण करण्याचे कार्य येथील क्षेत्रीय अधिकारी व वनकर्मचारी करतात, त्यामुळे त्यांच्या निवास सारख्या मूलभूत गरजा व समस्यांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचे कार्य दिव्या भारती यांनी केले आहे. दर्जेदार निवास व्यवस्था, लाईट व पाणी सुविधा व्हावी म्हणून सौर ऊर्जा व्यवस्था, निवास स्थानांना रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी वरिष्ठ स्तरावर सतत पाठपुरावा करत सुविधा निर्माण करून दिल्या. यामुळे सिमाडोह, रायपूर, हतरू, जारिदा व चौराकुंड या पाच परिक्षेत्रात निवास स्थानी सुलभ व्यवस्था बघायला मिळत आहे.
वसुंधरेचे शिपाई :-
आपल्या देशाचे जवान ज्याप्रमाणे आपल्या घरापासून दूर राहून देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याचे काम करतात अगदी त्याच प्रमाणे वनविभागातील कर्मचारी सुध्दा घरापासून दूर राहून या वसूंधरेचे संरक्षण व संवर्धन करण्याचे कार्य करतात. दिव्या भारती सारखे वनाधिकारी वन कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुणांची दखल घेऊन त्यांच्या समस्या दूर करून नवीन प्रेरणा देण्याचे काम करत असल्याचे चौराकुंड चे वन परिक्षेत्र अधिकारी रविकुमार खेरडे यांनी सांगितले.