
राखीविक्रीतून 10 हजाराची खरी कमाई
शालेय शिक्षण चार भिंतीच्या बाहेर प्रत्यक्ष व्यावहारिक कृतीतून सहज साध्य होते. याचा प्रत्यय नुकताच पळसखेड वासियांनी अनुभवला. जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात तब्बल एक हजारपेक्षा अधिक रंगीबेरंगी व आकर्षक ब्रांडेड राख्यांची निर्मिती केली. शनिवारला मुख्य चौकात विद्यार्थांनी स्टॉलच्या माध्यमातून राखी विक्रीतून तब्बल दहा हजारच्या आसपास खरी कमाई केली. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला गावकर्यांनी साथ देत गावातूनच राखी खरेदी केली. गावातील बहुतांशी भावाच्या मनगटावर लाडक्या विद्यार्थ्यांची राखी दिसणार आहे. आनंददायी पद्धतीने व दफ्तरमुक्त वातावरणात पळसखेडच्या विद्यार्थ्यांनी कृतियुक्त व्यावहारिक ज्ञानाचे धडे गिरविले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सुचनानुसार आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरु करण्यात आला. दफ्तरमुक्त वातावरणात कृती, अनुभव, खेळ, कला, पर्यटन प्रात्यक्षिक, स्वनिर्मिती, बौद्धिक खेळातून विविध कौशल्य विकास व्हावे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेड येथील सर्व शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांमध्ये सण उत्सवाच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान अर्जित व्हावे म्हणून शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी राखी निर्मिती कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे या राख्या तयार करतांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी यात सक्रीय सहभाग नोंदविला.

आकर्षक राख्यांची निर्मिती :-
शाळेतील शिक्षकांनी राख्यांसाठी लागणारे सर्व कच्चे साहित्य विविध रंगाचे मनी, धागे, वेलवेट कापड, रुद्राक्ष, पॅकिंग साहित्य आणले. वर्ग पहिली ते चौथीतील प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिल्या गेले. यामधून देवराख्या पासून ते रुदाक्ष राखी बनविण्यात आली. ब्रँडेड राख्यांच्या तुलनेत ह्या कुठेच कमी नाही. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका कुमुदिनी मेश्राम, प्रीती सपकाळ, तुळशीदास चव्हाण, अजय दाभेराव, सुशील देशमुख आदी शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.
स्टॉलच्या माध्यमातून खरी कमाई :
गावात मोबाईल व लाउड स्पीकरच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती दिल्या गेली. शनिवारला गावातील मुख्य चौकात स्टॉल उभारून गावकऱ्याना राखी खरेदी करण्याचे आवाहन केले.यात एक रुपयाच्या देवराखी ते डायमंड गोल्डन मण्यांची चाळीस रुपयाच्या राखी पर्यंतचा समावेश होता. गावातील चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी गावातून राखी खरेदी केली. शिक्षण विभागातील अधिकारी व गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.