मातीने दिला स्वयं रोजगार
अमरावतीच्या कोळणकर दाम्पत्याची यशोगाथा
मातीतून सुंदर कलाकृती निर्माण करणारा कलाकार म्हणजे कुंभार. पूर्वी गरजेनुरूप गाडगे, मडकं, सुरई, स्वयंपाकाची भांडी व ईतर स्वरुपात या मातीला वेगवेगळे रुपात बघितले आहे. यांनतर या मातीतून विविध देवदेवता साकारल्या जाऊ लागल्या. त्यानंतर या मातीला कला व त्यापलीकडे बघितल्या जाऊ लागले. आज मातीपासून बनविलेल्या टेराकोटाची मागणी वाढत आहे. टेराकोटा म्हणजे भाजलेली मातीतून साकारलेली कलाकृती. देहू येथील रहिवासी असलेल्या असलेल्या संजय कोळणकर या कलावंताने याच मातीत प्राण ओतून विविध सुंदर कलाकृती साकारल्या आहे. केवळ हि कला स्वतः पुरती मर्यादित न ठेवता आपल्या परिसरातील गृहिणींना हि कला शिकवून घरबसल्या त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
संजय कोळणकर मुळचे अमरावतीचे. जन्म १९७३ चा. वयाच्या चौथ्या वर्षी आईचे छत्र हरविले. घरची परिस्थिती बेताचीच. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीने शिक्षण थांबलेले. जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण झाल्याने कला विषयात उच्च शिक्षण घेण्याचे सर्व दार बंदच. उदरनिर्वाहासाठी काकांच्या पानठेल्यावर शिफ्ट पद्धतीने काम करत. अगदी घरोघरी वृत्तपत्र वाटायचे सुद्धा काम केले. मित्रांनी आधार दिला. त्यांनीच संजय यांना कला विषयात आवडीप्रमाणे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. १९९९ च्या दरम्यान भद्रावती मध्ये ग्रामोदय मधून मातीकलेचे धडे गिरवले. याच कालावधीत भैय्याजी या गुरुंसोबत नागपूर, मुंबई.दिल्ली,चेन्नई, बंगलोर,कोईमतूर येथील प्रदर्शनी बघायला मिळाली. प्रदर्शनीच्या माध्यमातून श्यामराव ठाकूर, लतिका कट, बल्वीत कट सारख्या मोठमोठ्या कलावंताच्या सहवासात अनुभवातून शिक्षण ग्रहण केले. अनेक ठिकाणी काम करून केवळ चहा व जेवणाची व्यवस्था होऊ लागली. नंतर मित्रांच्या मदतीने पुणे जवळील लढाळ गावात ‘माती’ नावाने स्टुडिओ उभारला. तिथे काही वेळ काम केल्यानंतर २००५ मध्ये देहू मधील प्रितीताई सोबत विवाह बंधनात गुंफले. परिस्थिती जेमतेम सुधारत होती. सासरच्या मंडळीने सहकार्याचा हात दिला. त्यानंतर देहू गावात ‘डिझायनर – आर्ट एंड क्राफ्ट’ नावाने स्टुडिओ सुरू केला. एका हाताला दुसरा हात मिळाल्याने स्टुडीओ मध्ये मूर्ती येण्यापूर्वी मातीला चाळणी लावून, गाळून त्याला एकजीव करून त्यापासून विविध कलाकृती साकारली जाऊ लागली. पुढे यातील काही मूर्तीतून कसेबसे पैसे मिळू लागले.
गणेशजी पावले.
छोट्या मोठ्या पॉटरी मध्ये विविध कला साकारल्या जाऊ लागली. यातूनच दोन इंच ते सहा इंच पर्यंत विविध पॉटरी कला विकसित केली. मातीला आकार देऊन विविधांगी मुखवटे, म्युरल, क्रिएटीव्ह फिचर, वुडन फ्रेम, टिनी पॉट ते साकारू लागले. संजयजीच्या कार्यात त्यांच्या पत्नी प्रीती कोळणकर वारली पेंटिंगच्या माध्यमातून मातीकलेला वेगळे सौंदर्य निर्माण करत होत्या. यातून एकदा गणपती मूर्ती विकण्यासाठी सदाशिव पेठ गाठले. तेथील दुकानदाराने पहिल्याच खेपेस ४०० रुपयाचे गणेश मुर्त्या खरेदी केल्या.कदाचित त्यांच्या आयुष्यातील त्या काळातील हि सर्वात मोठी कमाई. देहू ते पुणे प्रवास वाढू लागला. पुढे पुढे गणपती मुर्त्यांची डिमांड पण वाढू लागली. एकदा तर सहा ते सात हजार गणेश मुर्त्यांची ऑर्डर मिळाली. पण हि ऑर्डर एकट्या कडून पूर्णत्वास जाणे कठीण असल्याने सोबतच्या दोन भगिनीना आणखी काही महिलांना सोबत घेण्यास सांगितले. महिलांना पहिल्याच प्रयत्नात यश येणे कठीण असल्याने त्यांना हळूहळू काम शिकविणे सुरु केले. त्यात अडचणी येत गेल्या. कुटुंब कार्यामुळे त्यातील काही महिला गळू लागल्या. या दाम्पत्याने परिसरातील ४० ते ५० महिलांना मातीकलेचे प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक महिला शॉप ला येऊन काम करू शकत नसल्याने त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा दिली. ३० ते ४० टक्के मुर्त्या पुन्हा मातीत मिसळून पुन्हा नव्याने केल्या जात होत्या. पण ह्या महिला म्हणजे जणू त्यांच्या भगिनी. एका शब्दाने न दुखवता पुन्हा नव्या जोमाने प्रवास सुरूच होता. अगोदर एकजीव केलेली माती ह्या भगिनींनी त्यांच्या घरी पोहचून देणे. त्या मातीला आकार देऊन पुन्हा मुर्त्या वर्कशॉप ला आणायच्या , नंतर फिनिशिंग, त्यानंतर रंगसंगतीसाठी महिलांच्या घरी नेऊन देणे. त्यानंतर महिलांकडून आलेल्या प्रतिकृतीला आखीव, रेखीव, रंगसंगती व सौन्दर्यीकरण करण्याचे काम प्रीतीताई करतात. त्यांनतर फायनल टच अप झाल्यावर पँकिंग करून संजयजी ह्या मुर्त्या घेऊन बाजारात पुरवठा करतात. आज मात्र या परिस्थितीत सुधार झालाय. कलेवरील प्रेम, प्रचंड मेहनत व चिकाटी च्या जोरावर वर्षाचे लाखोंचे टर्नओव्हर आहे. एकेकाळी जेवणाची भ्रांत असलेल्या कलावंताने आज २० ते २५ बहिणींना उदरनिर्वाह उपलब्ध करून देत पुणे परिसरात स्वतःची वेगळी ओळख बनविली आहे.
मोफत प्रशिक्षण
ज्या भगिनींना पॉटरी कला शिकायची आहे त्यांच्यासाठी संजय कोळणकर हे मोफत कार्यशाळा घेतात. फक्त एका महिला ऐवजी पंधरा वीस महिला एकत्रित येणे शक्य असल्यास त्यांना शिकविणे सहज सुलभ होते. यासाठी ते कुठलेही प्रशिक्षण शुल्क आकारात नाही. हि कला पुढील पिढीत हस्तांतरित व्हावी, काम करणाऱ्याला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे शिवाय गरज पडल्यास त्यांना काम पण द्यावे हाच त्यामागील उद्देश असल्याचे संजय कोळणकर सांगतात.संजय कोळणकर यांचा संपर्क क्रमांक +91 98506 98084