जंगलाचा शेतकरी धोक्यात
धनेशमित्र होऊया : फळ व मोठे वृक्ष देईल नवंसंजिवन
आज जंगलात वड, पिंपळ, उंबर, पाखड, पाखडी, पिंपरी, धडउंबर, पुत्रंजिवा, जांभूळ, लोखंडी, कारी, सिंदोली, चारोळी, खीरणी आदी वृक्ष आपणास बघायला मिळतात या सर्व वृक्षाची पेरणी करण्यात ‘धनेश’ पक्षी महत्वाची भूमिका निभावतो. त्यामुळे धनेश पक्षी हा ‘जंगलाचा शेतकरी’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जातो. जगात या पक्ष्यांच्या एकूण 57 प्रजाती असून भारतात 9 प्रजाती आहे. यातील महाराष्ट्रात चार प्रजाती असून विदर्भात ग्रे हॉर्नबिल (राखाडी धनेश) व मलबार पाईड हॉर्नबिल ह्या दोन प्रजाती आढळतात. मध्यभारतात वास्तव्य असणारा मलबार पाईड हॉर्नबिल हा सुंदर टोपीवाला पक्षी जंगलातील वृक्षतोड, वाढते शहरीकरण, वातावरणातील बदल व मानवाच्या अतिरेकी हव्यासामुळे दुर्मिळ होत आहे.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचे प्रा. डॉ. गजानन वाघ हे मलबार हॉर्नबिल वर 2005 पासून संशोधन करत आहे.श्री शिवाजी महाविद्यालय येथे त्यांनी जैव विविधता संशोधन कक्षाची निर्मिती केली आहे. हॉर्नबिल संदर्भात सिंगापूर, फिलिपिन, मलेशिया, थायलंड आदी देशात रिसर्च पेपरचे सादरीकरण त्यांनी केले आहे. नुकतेच मध्यप्रदेश राज्य जैवविविधता बोर्ड भोपाळच्या सहकार्यातून पेंच टायगर क्षेत्रात मलबार पाईड हॉर्नबिलची सद्यस्थिती, विवरण तथा प्रजनन संदर्भात संशोधन केले आहे. मध्यभारतात मलबार संदर्भात सखोल व दीर्घकाळ संशोधन करणारे डॉ. गजानन वाघ हे एकमेव संशोधक आहे. दुर्मिळ झालेल्या मलबार हॉर्नबिलच्या संवर्धनासाठी त्यांनी ‘चला धनेश मित्र होऊया’ सारखे उपक्रम राबविले.
मलबार हॉर्नबिल हा साधारण 92 सेमी पर्यंत वाढतो. साधारण 50 ते 100 फुट वाढणाऱ्या वृक्षांवर याचा घरोबा असतो. मलबारचे पोट पांढऱ्या रंगाचे असून, शरीरावर काही भागात काळा रंग व चोच पिवळ्या रंगाची असते. डोक्यावर काळ्या-पिवळ्या रंगाची टोपी असते. हा पक्षी मिश्रहारी असून जांभूळ, चिकू, खिरणी, उंबर, पुत्रंजीवा, वड, पिंपळ, पाखड, पिंपरी, चंदन, शिंदोली सारखे फळ आवडीचे आहे. या पक्ष्यांच्या विष्ठेतून जंगलात मोठ्या प्रमाणावर फळझाडाची रोपण होते. फळांसह हा खार, लहान पक्षी, सरडा, पाल, साप व लहान ईतर जीवांवर ताव मारतो. जंगलाच्या या दुर्मिळ शेतकऱ्याला वाचविण्यासाठी आपल्याला समाजात जनजागृती करून धनेशमित्राची भूमिका वठवावी लागेल.
धनेशाचे अनोखे बाळंतपण :-
धनेशचा विणीचा हंगाम मार्च ते जून दरम्यान असतो. धनेशला जंगलातील जुन्या व मोठ्या झाडांच्या ढोलीत राहायला आवडते. विणीच्या हंगामात मादी स्वतःला तब्बल 88 दिवस ढोलीत बंदिस्त करून (बेड रेस्ट) घेते. तिच्या व पिलांच्या संरक्षणासाठी ढोलीला विष्ठा व मातीचा थर रचून दार केल्या जाते. केवळ चोच आत बाहेर करता येईल एवढी फट त्यामध्ये ठेवल्या जाते. एखाद्या वेळी एखाद्या ढोलीत जागा कमी आणि अंडी जास्त घातल्या गेली तर प्रसंगी एका अंड्याचे बलिदान देऊन दुसऱ्याला अधिक सुदृढ बनविते. या काळात नर पूर्णता केअर टेकरच्या भूमिकेत शिरून मादी व पिल्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेतो. या दरम्यान ढोलीत बंदिस्त राहल्याने मादीचे पिसे झडून जातात. नर मात्र अतिरिक्त मेहनतीमुळे बारीक होतो. पिल्ले मोठी झाल्यावर मादी व पिल्ले आपले घरटे फोडून बाहेरच्या जगात उडान भरतात.
चला धनेशमित्र बनूया :-
डॉ.गजानन वाघ हे धनेश पक्ष्याच्या संवर्धनासाठी विविध महाविद्यालयामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी आदी विविध भाषांतील माहितीपत्रके वितरीत करतात. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर, गणेशोत्सव, दुर्गोत्सव तथा अश्या उत्सव व पर्यावरण कार्यक्रम प्रसंगी तिथे दुर्मिळ धनेश बाबत माहिती देऊन लोकामध्ये जनजागृती करतात. यावर्षी अमरावती येथील श्रीकृष्ण पेठ येथील सृष्टी विनायक देखावा अंतर्गत ‘चला धनेशमित्र बनूया’ फलक लावून भाविकांचे लक्ष वेधले आहे. धनेश मित्र म्हणून फार वेगळे काम करायचे नाही, तर केवळ जिथे धनेश पक्ष्याचे घरटे आहे त्याला कुठलीही इजा होऊ नये याची काळजी घ्यायची. ज्या ठिकाणी किंवा ज्या वृक्षांवर धनेश घरटे करतो किंवा निवास करतो व फलाहार करतो त्या वृक्षांची कत्तल न करता संवर्धन करायचे. शिवाय परिसरात याबाबत जनजागृती करायची. एवढे केले तरी धनेश संवर्धनासाठी आपण मोलाचे योगदान दिले असे समजायला हरकत नाही.
वाघांचे अरण्यार्पण :-
जंगलातील एखाद्या वाघासाठी अनेक व्यक्ती किंवा संस्था पुढाकार घेतात त्यावर लाखो रुपये खर्च करतात पण एखाद्या पक्षाच्या संवर्धनासाठी तब्बल 19 वर्षापासून एक निष्णात वाघ पुढाकार घेत आहे असे वाघ सरांचे जवळचे मित्र मोठ्या गंमतीने व अभिमानाने म्हणतात. डॉ.गजानन वाघ हे बॉम्बे नॅच्ररल हिष्ट्री सोसायटी मुंबई चे आजीवन सदस्य असून अमरावती येथील वेक्स संस्थेचे मुख्य मार्गदर्शक आहे. पक्षी प्रेमापोटी त्यांनी अनेक जंगले पालथी घातली असून विदर्भ पक्षी मित्र संमेलनाचे (वाशिम) अध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे सचिव व आशिया खंडातील हॉर्नबिल विशेष गटाचे ते सदस्य आहेत. मलबार धनेश या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सातपुड्यातील जंगलाला त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे.
छायाचित्र सौजन्य :- डॉ.गजानन वाघ.