आदिवासींची अनोखी ‘कासाकुटी’
आगीत चांदी भस्मसात, कासाकुटीने विझविली पोटाची आग
मेळघाटातील साधारण 1982- 83 सालची घटना. एका आगीने साधारण चारशे साडे चारशे लोकवस्ती असलेले रोरा गावं आगीत भस्मसात झाले होते. प्रत्येक घर या आगीच्या लपेट्यात जळत असताना अनेक घरातील धातूंच्या वस्तू वितळल्या होत्या. साधारण 963 डिग्री सेंटीग्रेड वर वितळणारी चांदीचे दागिने सुद्धा या महाभयंकर आगींत वितळले होते पण आश्चर्याची बाब म्हणजे अनेक घरातील धान्य सुरक्षित होते. हे धान्य बचावले होते ते येथील धान्य साठवणुकीच्या पारंपारिक व अनोख्या पद्धतीमुळे. कासाकुटी हे आदिवासी लोकांचे धान्य साठवण्याची एक कोठी आहे. हा अनुभव सांगितला सेवानिवृत्त तहसीलदार मनोहरपंत चव्हाण यांनी. या आगीचे घटनेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार असून तेंव्हा रोरा गावातील आदिवासींना मदतकार्य पुरविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
अशी बनवतात कासाकुटी :-
आजच्या आधुनिक काळात आपण आपल्या घरातील धान्य कोठी,कणगी किंवा पिंप मध्ये साठवणूक करतो. आदिवासी जमातीमध्ये धान्य साठवणुकीसाठी कोणत्याही लोखंडी किंवा धातूच्या कोठीचा वापर केला जात नव्हता. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कोरकू या आदिवासी जमाती मध्ये माती, भुसा, बांबू पासून कासाकुटी बनविल्या जाते. आतल्या घरात मोकळ्या जागेत हि मातीची कोठी बनविली जाते. कुठे एक तर काही घरात एका पेक्षा जास्त कोठी बघायला मिळतात. काही कोठींत आतून विभाजन करून वेगवेगळे धान्य साठविल्या जाते.तर काही घरात एका धान्यासाठी स्पेशल कोठी बघायला मिळते. एका कोठीत साधारण तीन पोते ते पंधरा पोते धान्य बसेल अशी व्यवस्था असते. कोठी मोठी असल्यास खालून धान्य काढण्याची सुविधा असते,तर काही कोठीना केवळ एका जागेतून धान्य टाकणे व धान्य काढणे याकरिता एक झाकण असते. हे झाकण सुद्धा शेणा मातीने लेपून गरजेनुरूप बंद केल्या जाते. काही कोठींवर बाहेरून रंगीबेरंगी कलाकृती साकारल्या जाते. यात धान्य साठविल्याने कुठलीही कीड लागत नाही.
शासन झालं चकित
एवढी भयानक आग लागली असताना आदिवासी लोकांना अन्न मिळावे म्हणून काही धान्य व लोखंडी कोठ्या घेऊन तिथे आदिवासी विभागातील यंत्रणा पोहचली. पण गावातील चित्र पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती तरी घराचे अवशेष पूर्णतः जळालेले होते. आग एवढी भयानक होती की घरातील लोखंडी व ईतर धातूच्या वस्तू वितळल्या,चांदीचे दागिने सुध्दा आगीत भस्मसात झाले असताना धान्याला कुठलाही धक्का लागलेला नव्हता. एवढ्या आगीत धान्य सुरक्षित असल्याने आदिवासी लोकांचे ज्ञान किती प्रगत हे बघायला मिळाले.