पोट दुखीवरचा रामबाण उपाय -ओवा

पोट दुखीवरचा रामबाण उपाय -ओवा
आमच्या घरी आजी आजोबा होते. तेंव्हा त्यांच्या बटव्यात पानासोबत खायला सोप, ओवा, लवंग, विलायची, चुना, तंबाखू, चिकन सुपारी, काथ आवर्जून राहायचा. हा केवळ बटवा नव्हता तर पारंपारिक औषधरुपी चंचई होती. तुम्हा आम्हाला केव्हातरी पोटदुखीचा त्रास होतोच यावर रामबाण उपाय म्हणजे ओवा. ओव्याच्या तीन जाती असून यात अजमोदा (कोवळा ओवा), किरमाणी ओवा, खुरासनी ओवा असे प्रकार आहे. ओव्याची लागवड जास्त करून राजस्थानात होते. ओवा चवीने तिखट, उष्ण वीर्य, लघु, तीक्ष्ण आहे. या गुणांमुळे ओव्याच्या विविध औषधांमुळे दीपन, पाचन, रुची वाढविणे, वाताचे अनुलोमन, कफ कमी करणे, पोटदुखी,पोटातील आतड्यातील वायुगोळा, प्लीहावृद्धी व कृमीनाशनाचे खूप महत्त्वाचे काम सत्वर होते. ओव्यात ५% सुवासिक व उडनशील तेल असते. ओव्यात मिरची किंवा मोहरीचा तिखटपणा, काडेचिराईताचा कडूपणा आणि हिंगाचा संकोचविकास बंधकपणा हे धर्म एकवटलेले आहेत. सर्व किळसवाण्या द्रव्यांची रुची वाढविण्यास ओव्यासारखे दुसरे औषध नाही. ओवा बाळंतिणीस अवश्य देतात. एक काळ हिवतापामध्ये ओवा दिला जात असे. त्यामुळे अंगात हिव भरणे कमी होते, ताप भरल्यानंतर लगेच घाम येतो, थकवा कमी होतो. उलटी, अपचन, अजीर्ण, पोटफुगी, संडासला घाण वास येणे, पोटदुखी या रोगात तात्पुरता लगेच आराम पाव चमचा ओव्यामुळे मिळतो. ओव्यामुळे कफातील दुर्गंधी, सूक्ष्म रोगजंतू कमी होतात. फुफ्फुस विकारात ओवा चावून खाल्ल्यामुळे कफ उत्पन्न होण्याचे प्रमाण कमी होते, कफ ढिला होतो, तो लवकर पडतो आणि घुसमट कमी होते. दम्यामध्ये ओव्याचे चूर्ण गरम पाण्याबरोबर देतात. जुन्या काळी म्हातारी माणसे चिलीम ओढताना ओवाचा वापर करत होते. यातून घशाचा त्रास कमी होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.