क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कारात अमरावतीच्या चार शिक्षकांनी मारली बाजी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कारात अमरावतीच्या चार शिक्षकांनी बाजी
श्रीकृष्ण चव्हाण यांना जिल्हा व राज्याचा दुहेरी सन्मान
महाराष्ट्र सरकारने सन 2023 -24 चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची आज घोषणा केली असून यात अमरावतीच्या श्रीकृष्ण चव्हाण, शरद गढीकर, प्रमोद दखणे व सुनीता लहाने (ढोक) यांनी बाजी मारली.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ सुरू झाली आहे. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. यामध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक लक्ष दहा हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. या अंतर्गत नुकतीच 28 तारखेला राज्यस्तरीय मुलाखत घेऊन या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी आज घोषित करण्यात आली.
राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षक गटातून 39, माध्यमिक शिक्षक गटातून 39, आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक 19, सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका 8, विशेष शिक्षक 2, दिव्यांग विभागातून 1 तर स्काऊट गाईड अंतर्गत 2 असे एकूण 110 शिक्षकांची निवड करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा येथील श्रीकृष्ण इंदू चव्हाण यांना यावर्षी जिल्हा तथा राज्याचा आदर्श असा दुहेरी सन्मान मिळाला आहे. त्यांनी यावर्षी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन राज्यस्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञ म्हणून कार्य केले. शिवाय तालुक्यात एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
शरद वसंतराव गढीकर हे चंद्रभानजी विद्यालय कुंड सर्जापुर पंचायत समिती भातकुली येथे कार्यरत आहे. मूळ पिंड क्रीडा शिक्षकाचा ईतर विषयात देखील त्यांचा हातखंडा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ तालुका जिल्हा पुरते मर्यादित न ठेवता राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. त्यांच्या क्रीडा कामगिरी, उन्हाळी क्रीडा शिबिरामुळे ते राष्ट्रीय स्तरावर परिचित व्यक्तिमत्त्व आहे.
प्रमोद रमेशराव दखणे हे आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिंचखेडा पंचायत समिती चिखलदरा येथे कार्यरत आहे. हे व्यक्तिमत्व कायम विद्यार्थ्यांच्या घराड्यात राहत असून अस्सल वर्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान गणित विषयाचे धडे देतात. एक दिलखुलास, हसतमुख असलेले हे शिक्षक सुट्टीच्या दिवशी सुध्दा विद्यार्जनाचे कार्य करतात.
सुनिता शालिकग्राम लहाने (ढोक) ह्या अचलपूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोना येथे कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा राज्य नवोपक्रम स्पर्धेत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम त्या राबवित असतात. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्रजीसह जपानी भाषा बोलतात. त्या स्वतः तंत्रस्नेही शिक्षिका असून जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या तज्ज्ञ मार्गदर्शक आहे. वेबसाईट बनविणाऱ्या विदर्भातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहे.
या शिवाय मूळ अमरावतीच्या परंतु सध्या वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत शेकापुर (हिंगणघाट) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्जन करणाऱ्या दिपाली सतीश सावंत यांना सुध्दा प्राथमिक शिक्षक गटातून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील शाळेचा कायापालट त्यांनी केला असून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता विकास करणे यात त्यांचा हातखंडा आहे.
आज निवड झालेल्या सर्व 110 शिक्षकांवर राज्यभरातून विविध माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचीत्यावर सर्व निवड झालेल्या शिक्षकांना मुंबई येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले जाणार आहे.