वृक्षात अवतरले सृष्टीविनायक
श्रीकृष्ण गणेश मंडळाने दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश
अमरावती हि पूर्वीपासून कलेची नगरी राहिली आहे. या परंपरेचे प्रतिबिंब गणेशोत्सव तथा दुर्गोत्सव दरम्यान सुद्धा बघायला मिळते. श्रीकृष्णपेठ परिसरातील श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने सृष्टी मध्ये देव आहे. सृष्टी हे ईश्वराचे रूप आहे या थीमवर यावर्षी गणेशोत्सव देखावा उभारला आहे. यावर्षी जिल्हा स्त्री रुग्णालय रस्त्यावरील पिंपळाचे वृक्ष वादळाने उन्मळून पडले. मात्र या वृक्षाचे शिल्लक राहिलेल्या बुंध्यात एका व्यक्तीला श्री गणेशाचे निर्गुण रूप दिसले. या वृक्षाचा शिल्लक राहिलेला बुंधा स्थानिक बगीच्यामध्ये पुनर्जीविकरण करण्याचा विचार पुढे आला. याच बुंध्यामध्ये गणेशमूर्ती कोरून श्रीगणेशाचे सगुण रूप प्रत्यक्षात आणण्याची संकल्पना मंडळातील सदस्याने मांडली. श्रीकृष्ण गणेश मंडळाचे संस्थापक तथा माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी ती संकल्पना उचलत प्रल्हाद झगेकर या कारागिराच्या मदतीने त्या वृक्षात प्रत्यक्ष गणेश मूर्ती साकारली.
श्रीकृष्ण गणेश मंडळाने साकारलेला देखावा या व्हिडिओ द्वारा बघू शकता.
श्रीकृष्ण गणेश मंडळ गत 17 वर्षापासून विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असून यावर्षी त्यांनी धार्मिक व वैज्ञानिक अश्या दोन्ही रुपाची सांगड घालत सृष्टीविनायक हा देखावा साकारला. गणेशाची मूर्ती हि प्रत्यक्षात झाडात कोरली असल्याने शिवाय हे झाड पुन्हा वडाच्या वृक्षाच्या शेजारी नव्याने जन्माला आल्याने प्रत्यक्ष सृष्टीविनायकाचे मर्जीने हे घडून आल्याचे मिलिंद चिमोटे सांगतात. या परिसरात विविध संतानी व थोर महानुभावांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला त्याचे संदेश इथे सचित्र लावले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, गुरुनानकजी, संत गाडगे बाबा आदींचे निसर्ग विषयक संदेश इथे बघायला मिळतात. या सृष्टीची रचना हि हिरण्यगर्भातून झाली असून त्यातून ब्रम्हाजीची उत्पत्ती झाली. शिवाय विज्ञानातील बिग बँग थ्योरी सुद्धा अशाच प्रकारे सृष्ट्रीची निर्मिती झाल्याचे सांगतात. श्री गणेशाची स्थापना पंच महाभूतातून झाली आहे. नदी, जलस्त्रोताची निसर्गात काय भूमिका काय, पक्ष्यांची निसर्गातील भूमिका, धनेश, गिधाड, चिमणी, कावळा, घुबड, गरुड सारखे पक्षी निसर्गात स्थान काय, अन्नसाखळी मध्ये हे पक्षी किती महत्वाचे, हे पक्षी का दुर्मिळ होत आहे व त्याच्या संवर्धनासाठी काय करावे. यासह साप, कीटक, फुलपाखरे, अन्नसाखळी मधील विविध बाबींवर इथे प्रकाश टाकला आहे. याकरिता भारतीय महाविद्यालयातील डॉ. दीपा कुलकर्णी, शिवाजी विज्ञान महाविद्यालयचे डॉ.गजानन वाघ, नरसम्मा महाविद्यालय चे डॉ. श्रीकांत वर्हेकर, शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या श्रीमती झाडे आदीनी याकरिता योगदान दिले आहे.