हृदयी वसंत फुलताना
हृदयी वसंत फुलताना
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..या अशी हि बनवाबनवी चित्रपटातील गाण्याप्रमाणे सध्या निसर्गात वसंताचा बहार फुलला आहे. वृक्षाची पानगळती झाल्यानंतर साधारण माघ महिन्याच्या शुक्ल पंचमी पासून वसंत ऋतूला सुरुवात होते. वसंत ऋतूच्या पहिल्या टप्प्याला म्हणजे थंडगार दिवसाला शिशिर वसंत व दुसऱ्या टप्प्याला मधु वसंत संबोधल्या जातो.हा काळ थोडा उबदार असतो. यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला सुरुवात झाली. यावर्षी निसर्ग व दिनदर्शिकेवरील प्रेमाचा दिवस एकच आल्याने दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. वसंत ऋतूत हिवाळा ओसरून उन्हाळ्यातील उन्हाची चाहूल लागते. तापमान आल्हाददायक राहते. झाडांना ताजी पाने येतात. आंब्यांना मोहोर येतो. राग,रंग व आनंद साजरा करण्यासाठी हा ऋतू मानल्या जातो म्हणून याला ऋतुराज असेही म्हणतात. या ऋतूत पळस, पांगरा, शाल्मली कांचन, वाघाटी, शिवण, सीता अशोक, सालई, कुंभी, शमी, खंडू चक्का, महारुख आदी विविध वनस्पतींवर फुलांचा बहार आलेला असतो. शाल्मली म्हणजे काटेसावर वृक्षावर अक्षरशः फुलांची शाल पांघरलेली असते. मानवाला जसा आंब्याचा रस खाण्याचा मोह होतो तसाच पक्ष्यांसाठी हा मोसम म्हणजे ज्यूसबार चा हंगाम असतो. मधमाशा, फुलपाखरे फुलांच्या कळ्या भोवती रुंजन घालतात. ह्याच ऋतूत आंबा, पेरू, टरबूज, काकडी, टोमाटो सारखी लोकप्रिय फळे व भाज्या खायला मिळतात. कोकिळेचा स्वर सर्वत्र ऐकायला येतो. ऋतुंमध्ये वसंताला ऋतूंचा राजा म्हणून ओळखल्या जाते. कारण ह्या ऋतूत निसर्गातील सौंदर्य अलौकिक असते त्यामुळे सर्वाधिक पर्यटन, पिकनिक, कॅम्पिंग, हायकिंग ह्या ऋतूत केल्या जाते. पर्यटक काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ह्या ऋतूत पर्यटनाचा सर्वाधिक आनंद घेतात.
वसंत ऋतू हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा हंगाम असून अनेक सण व उत्सवाशी संबधित आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार प्रेमाची देवता कामदेव यावेळी त्याच्या गाढ झोपेतून जागे होतो. यात ऋतू दरम्यान होळी, रंगपंचमी, नवरात्री ,महाशिवरात्री व गुढीपाडवा सारखे प्रेम व एकात्मतेचे उत्सव साजरे केले जातात.