महाराष्टात धावतेय सोलर बाईक

महाराष्टात धावतेय सोलर बाईक
काही दिवसांपूर्वी असद अब्दुला नावाच्या व्यक्तीने सोलर पॅनलच्या व टाकावू साहित्याच्या मदतीने ७ सिटर सोलर बाईक चालविण्याचा व्हिडीओ इंष्टाग्राम वर पोस्ट केला होता. तो मोठ्या प्रमाणावर वायरल झाला होता. आता नाशिकच्या एका ध्येयवेड्या अभियंत्याने सोलर पॅनलवर बाईक तयार केल्याचे समोर आले आहे.
पेट्रोलने शंभरी गाठल्यापासून वाहने चालविणे दिवसेंदिवस खिश्याला आर्थिकदृष्ट्या परवडणे कठीण झाले आहे. आता आधुनिक युगात ई बाईकचा मोठा बोलबाला आहे. ई बाईकच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यात आणखी चार्जिंगचा खर्च व वेळ डोक्याला तापदायक होत आहे. यावर उपाययोजना म्हणून अभियंता असलेल्या जावेद शेख यांनी सोलर पॅनेलवर वाहन चालविण्याची कल्पना डोक्यात आली. विविध माध्यमांवर या संदर्भात माहिती संकलित करून त्यातून त्यांनी सोलर पॅनेलवर वाहन चालविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे केवळ २५ हजार रुपये खर्च करून त्यांनी हि गाडी तयार केली आहे.
ईलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या जावेद शेख हे बडोदा येथील स्नायडर कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या मनातील सुप्त इच्छा व डोक्यातील कल्पनेच्या आधारे त्यांचे काही वर्षापासून सोलर आधारित मोपेड प्रयोग सुरु होते, आता त्यांना यामध्ये यश आलेले आहे. आपल्या जुन्या मोपेड वाहनाला चारही बाजूने अँगल लावत त्यावर त्यांनी १०० वॅटचे सोलर पॅनेल बसविले. सोलर पॅनेलच्या माध्यमातून बाईकची बॅटरी चार्ज होते. यामुळे ही बाईक तब्बल ८० ते ११० किलोमीटर अंतर धावू शकते. यासाठी जावेद यांनी सिंक्रोनायझेशन सर्किटचा वापर केला असून, हे सर्किट सोलर आणि इलेक्ट्रिक या दोन्ही पर्यायांनुसार बॅटरी चार्ज करते. उन्हामध्ये मोपेड उभी असेल तरीही सोलरमुळे बॅटरी चार्ज होण्याची प्रक्रिया सुरूच असते. शिवाय उन्हात गाडी चालवितांना चालकाचा उन्हापासून बचाव होतो.यासाठी काही टाकावू वस्तूंचा देखील वापर या वाहनासाठी केला नाहे. केवळ सोशल मिडीयावर सोलर बाईक बघणाऱ्या नाशिककरांना त्यांच्या शहरात सोलर पॅनेलवर धावणारे हे मोपेड वाहन बघून सुखद अनुभव येत आहे.