स्वाभिमानी राजा – गरुड
स्वाभिमानी राजा – गरुड
गरुड हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखल्या जातो. त्याचे कारण म्हणजे सर्वाधिक उंचावर म्हणजे सुमारे १० हजार फुटांपेक्षा जास्त उंचावर तो उडू शकतो.शिवाय ५ किमी अंतरावरील आपली शिकार तो सहज बघू शकतो. आपल्या आकाराच्या दुप्पट वजनाची तो सहज शिकार करू शकतो. तो ताशी २०० किमी प्रती तास या वेगाने भरारी मारू शकतो. हा पक्षी थव्याने संचार न करता एकटा उडान भरतो . गरुडाला वादळे विशेष आवडतात.तो स्वताचे अन्न स्वतः मिळवतो. दुसऱ्याने टाकलेल्या किंवा इतरांनी शिकार केलेल्या आयत्या शिकारीवर तो आपला उदरनिर्वाह न करता स्वाभिमानी बाणा जगत स्वताचे अन्न स्वतः मिळवतो आणि हीच शिकवण आपल्या पिल्लांना पण देतो. गरुड जेंव्हा ४० वर्षानंतर म्हातारा होता तेंव्हा पुन्हा नव्याने आपली चोच,नखे व पंख यांना वारंवार दगडावर आपटून नव्याने येण्याची वाट बघतो. हा त्याच्या आयुष्यातील कठीण काळ असला तरी स्वाभिमानाने जगण्यासाठी त्रास सहन करतो. पुन्हा नव्या जोमाने नव्या पंख,चोच व नखात बळ मिळवत आपले सामर्थ्य सिद्ध करतो. एकंदरीत ७० वर्ष तो जगतो.
गरुडांच्या चोचीदेखील इतर शिकारी पक्ष्यांसारख्या मोठ्या व बळकट असतात. त्यांच्या बाकदार चोचींमुळे त्यांना मांस फाडणे सोपे जाते. गरुडांचे पाय व पंजे भक्ष्य पकडण्यासाठी बळकट असतात.कारण त्यांच्या डोक्याच्या मानाने डोळे खूपच मोठे असतात. त्यामुळे गरुडांची नजर खूपच तीक्ष्ण, म्हणजे माणसांच्या चौपट तीक्ष्ण असते. बऱ्याचशा शिकारी पक्ष्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. जंगलांमध्ये राहणाऱ्या गरुडांचे पंख छोटे असतात व शेपटी लांब असते. त्यामुळे ते उडताना हवेतल्या हवेत अगदी सहज कलाटणी घेऊ शकतात. अधिक वेगाने, झाडांच्या फांद्यांमधून, लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना छोटे पंख उपयोगी पडतात. आकाशात उंच भरारणाऱ्या गरुडांचे पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते. त्यामुळे ते वाढत्या वातप्रवाहावर सहजतेने तरंगू शकतात. परंतु याच कारणांमुळे त्यांना आकाशात झेपावणे व जमिनीवर उतरणे तुलनेने अवघड जाते.
गरुडांची घरटी काट्याकुट्यांपासून बनलेली असतात व ती बहुधा उंच कड्यांवर किंवा उंच झाडांवरती असतात. बरेच गरुड त्यांच्या पूर्वीच्या घरट्यांमध्ये परततात व काड्या, फांद्यांची भर घालत राहतात. गरुड एका खेपेस एक किंवा दोन अंडी घालतात; पण बऱ्याचदा आधी जन्मलेले व मोठे पिल्लू त्याच्या धाकट्या भावंडांचा जीव घेते, व अशा वेळी पालक मध्यस्थी करत नाहीत. पिलांमध्ये मादी पिल्लू नर पिलापेक्षा मोठे असल्यामुळे वरचढ ठरते.
गरुडांचे चार मुख्य गट आहेत.- 1) बूटेड गरुड- ह्यांचे खाद्य मुख्यतः खारी, ससे, कुकुटाद्य कुळातील पक्षी व कासवे असते. 2) सर्प गरुड- ह्यांचे खाद्य मुख्यतः विविध प्रकारचे सर्प असतात. 3) हार्पी गरुड- हे गरुड त्यांचा डोक्यावरील पिसाऱ्यामुळे ओळखले जातात. माकडे, शाखावेताळ खडूळ हे त्यांचे खाद्य असते. कधीकधी ते छोटे पक्षी किंवा सरपटणारे प्राणी खातात.4) मत्स्य गरुड किंवा समुद्र गरुड- त्यांचे प्राथमिक खाद्य मासे आहे. पण ते छोटे पक्षी, व मृत प्राणीदेखील खातात.