सारस होतोय हद्दपार

सारस होतोय हद्दपार
प्रेमाचं प्रतिक म्हणून सारस पक्षी ओळखला जातो. सारस पक्ष्याची एकदा जोडी जमली तर ते आयुष्यभर टिकते. सहसा हे पक्षी जोड्याने वावरतात. एखादे वेळी एखादा जोडीदाराचा वध झाला तर जिवंत राहिलेला सारस पक्षी आपल्या क्षेत्रात आहार – विहार करत नाही. पण एवढा सुंदर पक्षी सध्या संकटग्रस्ताच्या यादीत आलेला आहे. या पक्ष्याचे जतन व्हावे म्हणून दोन वर्षापूर्वी न्यायालयाने स्वयंस्फूर्तीने हा विषय पटलावर आणत सरकारला ह्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काय पाऊले उचलली या बाबत विचारणा केली आहे.
स्थलांतरण न करणारा सारस पक्षी भारतीय उपखंड, दक्षिण पुर्व आशिया तसेच ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. त्यांचे वास्तव्य पाणथळ जागा, दलदलीचा प्रदेश, कालवे, शेतं, उथळ पाणी असलेल्या नद्या व तलाव येथे असतं. हा पक्षी कंदमुळं, बीज व अन्नधान्य , छोटे खेकडे,बेडके यावर आपली उपजीविका भागवितो. सारस हा पक्षी दक्षिण भारतातून पूर्णतः हद्दपार झालेला उत्तर भारतात बालाघाट,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश विशेषतः गंगेच्या खोऱ्यात त्याचे अस्तित्व टिकून आहे, मात्र जर हा गोंदिया – भंडारा येथे आपले अस्तित्व टिकवू शकला नाही तर हा पक्षी महाराष्ट्रातून सुध्दा नामशेष होऊ शकतो. यासंदर्भात सारस चे संवर्धन व्हावे म्हणून अगोदर गोंदिया निसर्ग मंडळ व आता सेवा संस्था गोंदिया द्वारा पुढाकार घेण्यात आला आहे.
2004 मध्ये केवळ महाराष्ट्रात सारस पक्षी 4 च्या संख्येत होते. पुढे दुर्मिळ सारस साठी गोंदिया निसर्ग मंडळ यांनी पुढाकार घेत स्थानिक परिसरात जनजागृती केली. हा पक्षी मुख्यतः धान शेतीच्या परिसरात वास्तव्य करत असल्याने निरनिराळ्या प्रकारे उपाय योजना करण्यात आल्या. या अंतर्गत शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी संस्था मार्फत निधी गोळा करण्यात आला. पुढे स्थानिक पक्षी प्रेमींनी राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलनाच्या माध्यमातून हा विषय रेटण्याचा प्रयत्न केला. 2009 नंतर 2010 (नागपूर), 2011(अमरावती), 2012(मुंबई) येथे पार पडलेल्या पक्षी मित्र संमेलना मध्ये सहभागी होऊन यावर चर्चा करण्यात आली. याच दरम्यान या पक्ष्याची गणना करण्यात आली. निसर्ग संस्था व सेवा संस्थेच्या परिश्रमाचे फलित म्हणजे 4 सारस पक्ष्यांची संख्या 65 पर्यंत पोहचली. पण अलिकडल्या काळात पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले असून अलिकडल्या पक्षी गणना दरम्यान 30 पक्षी असल्याचे आढळून आले. न्यायालयाने यात हस्तक्षेप करून सूमोटो घेत पब्लिक इंटरेस्ट लितिगेशन नुसार जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभागाला पक्षी संवर्धनासाठी ठोस उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहे. गोंदिया मधील सावन बाहेकर, मुकुंद धुर्वे सारख्या ज्येष्ठ पक्षी प्रेमी मुळे सारस संरक्षण व संवर्धन मोहिमेला गती आली. सारस संवर्धन साठी काम करणाऱ्या पक्षी मित्रांचा सेवा संस्था तर्फे सत्कार घेण्यात येतो. यावर्षी सुध्दा नुकताच असा सन्मान सोहळा घेण्यात आला. सारस पक्षी गोंदिया – भंडारा भागात टिकला तरच आमचा सत्कार सार्थकी लागेल अशी जनभावना स्थानिक पक्षीप्रेमीमध्ये आहे.
नामशेष होण्याची कारणे
सारस पक्ष्यांची अंडी पळवून नेणे, विषबाधा, स्थानिक क्षेत्रातील इलेक्ट्रिक टॉवर, शेतीचे नुकसान होते म्हणून घरट्याची नासधूस, पिकातील बदल, रासायनिक खतांचा अती वापर यामुळे हा पक्षी विलुप्त होत आहे. यावर्षी सारस पक्ष्यांचे 5 ते 6 घरटे असून बाघ व पैनगंगा नदीच्या काठावर या पक्ष्यांचे संचार क्षेत्र आहे. हा पक्षी टिकवायचा असेल तर पक्षी प्रेमिंसह स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन एकत्रित काम गरजेचे असल्याचे पक्षी मित्र संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.जयंत वडतकर यांनी सांगितले.