पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघोबांसोबत चंद्र ताऱ्यांची सफर

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघोबांसोबत चंद्र ताऱ्यांची सफर
व्याघ्र प्रकल्प म्हटले कि नजरेसमोर येतात ते विविध प्रकारची हरिणे व त्यांची शिकार करणारी विविध शिकारी प्राणी, सोबतीला या जंगलाचा राजा म्हणजे वाघ. दिवसा सफारी दरम्यान जंगलातील पक्षी, प्राणी, वनस्पतीचे सौंदर्य टिपल्यानंतर पेंच च्या जंगलात तुम्हाला रात्रीच्या वेळी डोळ्यांना भुरळ पाडणारे अवकाशातील चंद्र तारे व ईतर ग्रह बघायला मिळणार आहे. याकरिता लवकरच या व्याघ्र प्रकल्पात डार्क स्काय पार्क निर्माण होणार आहे.
डार्क स्काय पार्क म्हणजे असं क्षेत्र जिथे फक्त प्रदूषणमुक्त वातावरणात अगदी नैसर्गिक प्रकाशात आकाश सहज न्याहाळता येईल. इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने (IDSA) पेंच प्रकल्पाला या साठी मान्यता दिली आहे. यापूर्वी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. वन्यप्रेमींसोबतच खगोलप्रेमीना संशोधन करण्यासाठी पेंच प्रकल्प आता महत्वाची भूमिका निभावणार आहे. या सर्व बाबींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पेंच व्याघ्र प्रकल्पाचं नाव जाणार आहे. 2022 मध्ये याच संस्थेने लडाखमधलं स्वच्छ आकाश आणि प्रदूषणमुक्त परिसरामुळे याच भागात डार्क स्काय रिजर्व्हला मान्यता देण्यात आलेली होती. लडाखच्या हानले वेधशाळेच्या परिसरात आकाश निरीक्षणासाठीचं राखीव क्षेत्राला डार्क स्काय रिजर्व्ह असंही म्हणतात. हानलेच्या वेधशाळेला भारतीय अंतराळ निरीक्षण वेधशाळा (Indian Astronomical Observatory) म्हणूनही ओळखलं जातं. ही जगातली सगळ्यांत उंच वेधशाळा आहे.
डार्क स्काय पार्क उभारण्यासाठी परिसरातील कृत्रिम प्रकाशामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित केले जाणार आहे. या व्याघ्र प्रकल्पातल्या सिलारी बफर झोन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीमध्ये एक दुर्बीण बसवली जाणार आहे. स्थानिक समुदायांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पवनी बफर क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये 100 हून अधिक पथदिवे आणि सामुदायिक दिवे जमिनीकडे तोंड करून लावण्यात आलेले आहेत. त्यांची दिशा बदलण्यात आली आहे. यामुळे प्रकाश प्रदूषण कमी होतं आणि निशाचर परिसंस्थेला कमीत कमी व्यत्यय येतो. एकूणच काय तर पर्यटकांना रात्रीच्या वेळी येणारा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी हे प्रयत्न केले गेले आहेत.